पनवेल : नवी मुंबईतील खारघर उपनगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीने समाजमाध्यमावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी थेट धावत्या मर्सिडीज मोटारीवर ‘ऑरा फार्मिंग डान्स’ करत प्रवाशांचे लक्ष वेधले. या धोकादायक कृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ही तरुणी चालत्या मर्सिडीज गाडीवर चढून स्टंट करताना दिसत असून, काही ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’साठी जीवावर उदार होऊन केलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला होता.

या व्हिडीओची गंभीर दखल घेत खारघर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. संबंधित तरुणीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी दिली. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे ‘ व्हायरल होण्याच्या’ हव्यासापोटी नागरिकांनी सार्वजनिक सुरक्षेचा विचार न करता केलेल्या कृत्यांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.