वृत्तपत्र वाचनासाठी स्वतंत्र दालन
स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील चळवळींची माहिती मिळावी म्हणून उभारलेल्या गोपाळकृष्ण वाचनालयाचा चेहरामोहरा बदलत आहे. वाचनालयाच्या समोरील भागात नवे बांधकाम करून वृत्तपत्र वाचनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर वाचनालयाची मूळ इमारत आजही त्याच स्वरूपात जपण्यात आली आहे.
स्वातंत्र्य चळवळींची माहिती मिळावी म्हणून काही जण उरणमधील देऊळवाडीत भेटत असत. त्या वेळी हाती लागलेल्या एखाद्या वृत्तपत्राचे वाचन केले जात असे. चळवळींच्या ध्यासातून शहरात वाचन संस्कृती उदयाला आली. ७३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९४३ मध्ये उरणच्या गोपाळकृष्ण वाचनालयाची स्थापना करण्यात आली. तालुक्यातील पहिले वाचनालय.
समाजात नीतिमूल्यांचे बीज रोवणाऱ्या या संस्थेने तालुक्यात जास्तीत जास्त वाचनालये निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली. स्वातंत्र्यानंतरच्या पिढय़ांना वाचनाची आवड निर्माण करण्यात या वाचनालयाचा मोठा हात आहे.
गुर्जर वकील, शारदाबाई कोर्लेकर, भार्गव वामन कोर्लेकर, गुलाबचंद पारेख आदींनी मिळून अगदी तुटपुंजी रक्कम गुंतवून देऊळवाडीतील एका कौलारू घरात गोपाळकृष्ण वाचनालय उभारले. या वाचनालयाचा शासन दरबारी ‘अ’ दर्जा आहे.
या वाचनालयात चार कर्मचारी कार्यरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वाचनालयाकडे एक हजार २६७ फुटांची जागा आहे. देऊळवाडीत देवी-देवतांची मंदिरे आहेत. दर्शनासाठी आलेला भाविक काही वेळाने या वाचनालयात येतो.
परिपूर्ण वाचनानंद
वैचारिक, नाटक, कला व संस्कृती, कथा, कादंबऱ्या, बाल साहित्यासह मराठी, गुजराती, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. बाल वाचकांसाठी या वाचनालयात स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यांची स्वतंत्र नोंदणी केली जाते. वाचनालयात आजीव, तसेच नियमित असे ८०० सदस्य आहेत. त्यांच्याकडून शुल्क आकारले जाते. वाचनालयाची ग्रंथसंपदा २७ हजार ९८५ इतकी आहे. तर ७२ मासिके, २१ दैनिके, ११ साप्ताहिके आणि सहा पाक्षिके असतात.