पनवेल – पनवेल शहरातील विठ्ठल खंडप्पा (व्ही.के.) विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सामाजिक संघटना आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळी निमित्त भव्य रांगोळी मोफत प्रदर्शन पनवेल शहरातील सीकेपी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. १८ ते २६ आक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे.
माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी सीकेपी हॉलचे कार्यकारी सदस्य राजू गुप्ते यांच्यासह व्ही. के. ७५ सामाजिक मंडळाचे सर्व सदस्य तसेच रंगदीप क्रिएशनचे सर्व कलाकार सदस्य व नागरिक उपस्थित होते.
माजी खा. रामशेठ ठाकूर व्ही. के. विद्यालयात शिक्षक सेवेत असताना १९७५ साली त्यांचे विद्यार्थी असणा-या विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या रांगोळी प्रदर्शन आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन शिक्षक ठाकूर यांच्या हस्ते करण्याचा हट्ट केला.
सामाजिक बांधिलकी या उद्देशाने काही सामाजिक कार्य करण्याचे या विद्यार्थ्यांच्या गटाने ठरविले. आतापर्यंत ५२ आदिवासी जिल्हा परिषद तसेच वस्तीगृहातील दुर्मिळ शाळांमध्ये की जिथे कुठलीही सामाजिक संस्था कार्य करण्यासाठी पोहोचत नाही अशा शाळांमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करत आहेत. मोफत रांगोळी प्रदर्शन हा याच उपक्रमाचा एक भाग आहे.
सीकेपी सभागृहात आयोजित रांगोळी प्रदर्शनात गणपती – दिशा पाटील, व्हि.के. ७५ – शरयु घरत, लोकनेते रामशेठ ठाकूर – मनोज भोपी, कलावंती – योगेश्री ढमाले, कानिफनाथ महाराज – नेहा धामणकर, वात्सल्य – नेहा घरत, वैजयंती माला – प्रकाश नवाळे, दशावतार – योगेश्री ढमाले, वासुदेव बळवंत फडके – दिलीप शिगवण, हनुमान चालीसा – किर्ती,योगेश्री, साईबाबा – डॉ. अमोल सलाग्रे, देवानंद – ज्ञानेश्वर कारेकर, रतन टाटा – डॉ. दिलीप शिगवण, शिवाजी महाराज – किर्ती घरत, कामधेनु – तन्वी भोपी, हनुमान – हिमांशु भोपी, राधा कृष्ण – रत्नेश घरत, कांतारा – कशिश तिखे, संस्कार भारती – शरयु घरत यांनी अशा रांगोळ्या काढल्या आहेत.