उरण : मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने उरणच्या अनेक गावातील घरांना पाणी शिरले आहे. तर चिरनेर आणि कंठवली या गावांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. तर शहरातील कुंभारवाडा, बोरी मार्ग जलमय झाले आहेत. त्याचप्रमाणे दिघोडे व वेश्वि परिसराततील कंटेनर गोदामात ही पाणी साठलं आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज खंडीत झाल्याने मंगळवारची रात्र नागरीकांना अंधारातच काढावी लागली.

उरण मधील शाळांना सुट्टी

उरण शहरातील रस्ते जलमय झाल्याने सुरक्षा म्हणून उरण एज्युकेशन सह काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जलसेवा खंडीत

उरण ते अलिबाग मधील रेवस करंजा ही जलसेवा खराब हवामानामुळे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोरा मुंबई व जेएनपीटी ते मुंबई सेवेवरही परिणाम झाला आहे.