नवी मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम नवी मुंबईतील लोकल वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आजही हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून, प्रवाशांना सकाळच्या गर्दीच्या वेळी गैरसोय सहन करावी लागत आहे.

काल दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाड्या काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. दुपारनंतर मध्य रेल्वेच्या चुनाभट्टी, कुर्ला, वडाळा अशा महत्वाच्या स्थानकातील पाणी ओसरल्यावर रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात आला. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मध्य आणि हार्बर-ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या आजही संथ गतीने चालत असून, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या ५-१० मिनिटे उशिराने आहेत. तथापि, रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प न होता सुरू असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

प्रशासनाचे आवाहन

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “गरज असल्यासच प्रवास करावा, प्लॅटफॉर्म आणि फूटओव्हर ब्रिजवर चालताना काळजी घ्यावी. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे.”. अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आली आहे. तसेच, मुसळधार पावसात अचानक पाणी वाढण्याचा धोका असल्याने खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.

शाळा व कंपन्यांचा निर्णय

काल झालेल्या पावसामुळे नवी मुंबईतील अनेक शाळा-महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर काही खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवले आहेत. या शिवाय, आयटी कंपन्या व कॉर्पोरेट कार्यालयांनीही कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिल्याने सकाळी स्थानकांवरची गर्दी तुलनेने कमी पहायला मिळाली.

हवामान विभागाचा इशारा

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, नवी मुंबईत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका कायम असल्याने महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत.

परिस्थिती नियंत्रणात

नवी मुंबई महानगरपालिकेकडून शहरात सातत्याने पाणी उपसा यंत्रणा राबवली जात आहे. काही भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी मोठा अपघात टळला आहे. रेल्वे सेवाही काहीशी उशिरा का होईना, पण सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.