पनवेल : पनवेल शहरातील विजेच्या अचानक गायब होण्यामागे मानवी हस्तक्षेप असल्याचे अखेर वीज महावितरण कंपनीच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. आंदोलनाच्या काळात वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ९ ऑक्टोबर रोजी दुपारी पनवेल शहरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने शहरात गोंधळ माजला होता. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले, तर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाणीवपूर्वक वीज यंत्रणा बंद केल्याची शक्यता व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर सुमारे १७ दिवसांच्या चौकशीनंतर वीज महावितरण कंपनीने या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, पनवेल शहरातील वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या वीज व्यवस्थापन युनिट (आर.एम.यू.) केंद्रातील यंत्रणा जाणूनबुजून बंद करण्यात आली होती. या यंत्रणेची माहिती असलेल्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याची शंका वर्तविण्यात आली असून, संबंधित व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे. यामुळे महावितरण कंपनीने सोमवारी अनोळखी व्यक्तीविरुद्ध पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

राज्यभरातील महावितरण कर्मचाऱ्यांनी त्या काळात आंदोलन पुकारले होते. त्याच वेळी पनवेल शहरात दुपारी तीनच्या सुमारास तुलसी हाइट्स, अशोक विजय सोसायटी, चिल्ड्रन पार्क, उर्दू शाळा आणि महापालिका मैदान परिसरात दीर्घकाळ वीज गायब होती. जलशुद्धीकरण केंद्रालाही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक आणि महापालिकेला मोठा त्रास सहन करावा लागला.

घटनेनंतर नागरिकांच्या संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते आणि पनवेल शहर पोलिसांनी नागरिकांची समज काढत वीज व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांच्या चौकशीतून या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून, सर्वसामान्यांना अंधारात ठेवणाऱ्या या कटाचा सूत्रधार कोण हे शोधणे आता पोलिसांपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.