नवी मुंबई : राजकीय आरोपांमुळे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारी शेवटच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने हरकती दाखल झाल्या. महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी जाहीर केलेला या आराखड्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव राहिल्याचा आरोप भाजपसह विरोधी पक्षांनी केला होता. वनमंत्री गणेश नाईक यांना धक्का देण्यासाठी त्यांच्या समर्थकांचे प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडले गेल्याचा आरोपही केला जात होता. नाईक यांच्या समर्थकांनी एका दिवसात एक हजारांहून अधिक हरकती नोंदवत या आराखड्याला जाहीर विरोध सुरू केल्याचे पाहायला मिळाले.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे ऐन गणेशोत्सवाच्या सुरुवातीला प्रारूप प्रभागरचना जाहीर केली असून विविध पक्ष तसेच इच्छुकांमध्ये प्रारूप प्रभागरचनेवरून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या प्रभागरचनेवर २५०० हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. २०१५ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकींसाठीच्या प्रारूप प्रभागरचनेवर २०० पेक्षा जास्त हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत हरकती सूचनांची संख्या वाढली असून ती २५०० पर्यंत गेली आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणात हरकती आलेल्या असताना दुसरीकडे अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही दिला आहे. तर हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली आहे.दरम्यान गुरुवारी पालिकेत माजी खासदार संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईकही उपस्थित होते.

पालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेत २८ प्रभाग असून १११ नगरसेवक असणार आहेत. निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून पालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना घेण्याची ४ सप्टेंबरपर्यंतची मुदत गुरुवारी संपली आहे. त्यातच १४ गावांचाही सहभाग करण्यात आला असून एका ठरावीक पक्षाला फलदायी तर इतरांना निवडणुकीपूर्वीच अडचणीची ठरणारी प्रभागरचना केल्याचा आरोप विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मागील पालिका निवडणुकांपेक्षा या निवडणुकीमध्ये अधिक हरकती सूचना आल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुक विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकत घेण्यात आली आहे. प्रभागरचनेच्या सीमेबाबत ४ हरकती घेतल्या असून योग्य बदल अपेक्षित आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाने योग्य बदल न केल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. गणेशोत्सव सुरू असताना हरकती घ्यायची वेळ पालिकेने आणली. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते व नागरिकांना वेळ मिळाला नाही. समीर बागवान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष

नवी मुंबई महापालिकेने केलेली ही प्रभागरचना कोणी बुद्धिमान माणसाने केली आहे की लहान मुलाने असा प्रश्न आहे. कारण या प्रभागरचनेत अनेक चुका आहेत. आम्ही हरकत नोंदवली असून जर त्यात बदल केला नाही तर न्यायालयात जाणार असून न्यायालयाकडूनच पालिकेला चपराख बसेल. सागर नाईक, माजी महापौर

नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेबाबत २५०० हरकती आल्या असून त्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. हरकत घेणाऱ्यांना निश्चित वेळ दिली जाणार आहे. भागवत डोईफोडे, उपायुक्त, निवडणूक विभाग