उरण : सलग महिनाभर पावसाचा खंड पडल्याने उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके संकटात आली आहेत. यातील पन्नास टक्के पीक नष्ट झाले आहे. तर येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस न झाल्यास संपूर्ण शेतीच शेतकऱ्यांच्या हातची जाण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. उरण तालुक्यात ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत आता पर्यंत सरासरी २ हजार २३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये १ हजार ७१४ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२२ मध्ये ३६२ मिलीमीटर मात्र आता पर्यंत अवघ्या ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाअभावी उरण तालुक्यातील भात शेती संकटात आली आहे.

उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक तालुका बनला आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणच्या नागाव, केगाव, चाणजे व खोपटे, कोप्रोली, चिरनेर, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीचे पीक घेतले जात आहे. हे साधारण २ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर येथील विविध उद्योगामुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद केल्याने काही शेती नापिकी होत आहे. अशा सर्व संकटांचा सामना करीत उरण मधील शेतकरी मेहनतीने व नेटाने शेती करीत आहे.

हेही वाचा : किरकोळ बाजारातील दरांवर नियंत्रण कोणाचे? कांदा आणि टोमॅटोची दुप्पट दराने विक्री

परंतु यावर्षी पाऊस उशिरा आला. तर त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेती योग्य पाऊस झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर अतिवृष्टी झाली आणि त्यात आलेली पिके कुजून वाया गेली. त्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागली. तर मागील महिना भरापासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतातील पिके पाण्याविना करपू लागली आहेत. त्याच्रमाणे काही ठिकाणी पिकावर करपा रोग आला आहे. पाऊस थांबल्याने भात पिके मूळ धरू शकली नाहीत. त्यातच सध्या नुसतं ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकावर तूर्तुऱ्या रोगाचा ही प्रादुर्भाव वाढू लागला असून शेतकऱ्यांची शेती हातची जाण्याची वेळ आली असल्याची माहिती चिरनेर येथील प्रगतिशील शेतकरी प्रफूल खार पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : गडहिंग्लज : विनयभंग प्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल; वाचा नेमका काय प्रकार आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरण्या करण्याची वेळ

पावसाच्या अनिमिततेमुळे उरण मधील शेतकऱ्यांवर यावर्षी तिसऱ्यांदा पिकाची पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबरपर्यंत पिकाची वाट पहावी लागणार आहे.