नवी मुंबई : सिडको भवनामध्ये काम करणारे ३५० कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचे वेतन २८ फेब्रुवारी उजाडला तरी मिळालेले नाही. सिडकोच्या वरिष्ठांनी कंत्राटदाराला नोटीस देऊन, तोंडी सूचना देऊनही त्याने दोन दिवसांत वेतन देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असताना शुक्रवारी दुपारी तीन वाजता सिडकोच्या कायमस्वरुपी काम करणाऱ्या साडेसातशे कर्मचारी आणि तीनशेहून जास्त अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर महिना संपण्यापूर्वीच बॅंक खात्यात वेतन जमा होण्याचे लघुसंदेश खणखणले. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रवर्गासाठी होणाऱ्या भेदभावाविषयी संताप व्यक्त होत आहे.
सिडको भवनामध्ये मागील अनेक वर्षे लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई आणि अग्निशमन कर्मचारी अशा कार्यालयीन पदांवर हे प्रकल्पग्रस्त कामगार काम करतात. दोन (१६ जानेवारीला) महिन्यांपूर्वी या कामगारांनी निम्या दिवसाचे कामबंद आंदोलन करुन सिडकोच्या उच्चपदस्थांचे लक्ष वेधले. आंदोलनानंतर दुपारच्या बैठकीत मुंबई लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सिडकोच्या कार्मिक विभागाने लवकरच भविष्य निर्वाह निधी कंत्राटदार जमा करेल आणि वेतन वेळेवर देऊ असे आश्वासन दिले. मात्र वेळोवेळी आश्वासन देऊन सुद्धा कामगारांना वेळेत वेतन अजूनही मिळू शकले नाही. सिडकोच्या कार्मिक विभागाचा कंत्राटदारावर कोणताही अंकुश न राहिल्याने कंत्राटदार सिडकोच्या नोटीस प्रक्रियेला सुद्धा केराची टोपली दाखवत असल्याने कंत्राटी कामगार संतापले आहेत. लोकसत्ताने याबाबत ठळक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी यांनी सिडकोचे कार्मिक विभागप्रमुख प्रमदा बिडवे यांच्याकडून वेतनाबाबत बैठक घेऊन माहिती मागवली. मात्र त्यानंतरही कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिलेले नाही.
कंत्राटी कामगारांना वेतन देण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदार कंपनीला दिले आहेत. वेतन देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको महामंडळ