नवी मुंबई : गेली २ वर्षे सातत्याने कचरा वाहतूक आणि संकलन कामाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून मुदतवाढ दिली जात होती. परंतु अखेरीस या ९३४ कोटी खर्चाच्या कामाचा श्रीगणेशा झाला. नवी मुंबई महापालिकेने या नव्या कामाच्या कार्यादेशानुसार कामाला सुरुवात झाली असून ठेकेदाराकडून शहरात एकूण २४ हजार कचराकुंड्यांचे वाटप आठवडाभरात होणार आहे. तर दुसरीकडे पालिका इतिहासात प्रथमच ई-कचरा वाहतूकीचाही श्रीगणेशा झाला आहे.

माजी उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभरात राबवण्यात आलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानापासूनच नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेत आपला वेगळा नावलौकिक राज्य व देशभरात कायम केला आहे. देशात स्वच्छतेत सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या शहरांकरिता ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली असून त्यात नवी मुंबई, इंदूर, सुरत या शहरांना मान मिळाला आहे. महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात राबवण्यात येत असलेल्या स्पर्धेपासून नवी मुंबई महापालिका सातत्याने महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान पटकावत आहे.

गतवर्षीही देशात तिसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला असून महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची सुरवात केली आहे. ठेकेदाराला दिलेल्या ठेक्यामध्ये नमूद असल्याप्रमाणे ठेकेदाराने एकदा सहकारी गृहसंस्थांना कचराकुंड्या द्यायच्या असून शहरात निळ्या व हिरव्या रंगाच्या २४ हजार कचऱाकुंड्यांचे वाटप केले जाणार आहे.

पालिकेच्या कचरा वाहतूक ठेकेदाराची ठेका मुदत संपून दोन वर्षे झाल्यानंतरही सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती. पालिकेने कचरा वाहतूक व संकलनाची निविदा पालिकेने प्रसिद्द केली. त्यात पालिकेच्या इतिहासात प्रथमच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधाही राबवली जाण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु निविदा प्रकियेसाठी अवधी लागला. देशपातळीवर स्वच्छ शहराचा बहुमान असलेल्या शहरात आगामी काळात कचरा संकलनात विविध सुधारणा करत ई-कचरा वाहतूक व्यवस्था करण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे पालिकेच्या इतिहासात प्रथमच आधुनिक पध्दतीच्या ई-वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले असून.

शहरात ४० ई वाहनांच्याद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. पालिकेने शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते. आता नव्या ठेकेदाराला ९ वर्षांचा ठेका देण्यात आला आहे.

नव्या निविदेत पालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्तीही वाढवली आहे. विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचे लक्ष्य आहे. तसेच २०१५ पासून एकत्रित कचरा संकलन केले जात होते. परंतु नव्याने दिलेल्या कामामध्ये शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अश्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर सुरू झाला असताना कचरा वाहतुकीसाठीही पालिकेच्या इतिहासात प्रथमच कचरा वाहतूकीसाठी छोट्या इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात शहर सुशोभिकरणाप्रमाणेच पर्यावरणास पूरक अशा अनेक सुधारणा केल्या जात आहेत. विशेषतः करोनाच्या कालावधीनंतर ‘रस्त्यावर शून्य कचरा ‘ नजरेसमोर ठेवून व ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पालिकेने बंधनकारक करण्यात आलेले होते. पालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त कारभार पाहत असल्याने नव्याने देण्यात आलेल्या कचरा वाहतूक व संकलनाबाबत पालिकेने व्यापक नियोजनाचे लक्ष आहे. कचरा वाहतूक , संकलन निविदा शहरासाठी महत्वपूर्ण असून शहराला देशात स्वच्छतेबाबत मिळालेला नावलौकीक टिकवण्यासाठी व सातत्याने वाढवण्यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत असून त्याची अंमलबजावणीही तितकीच महत्वाची ठरणार आहे.

४० ई वाहनांचाही वापर

सध्या पालिकेत कचरा वाहतुकीसाठी ११० गाड्या वापरल्या जात असून नव्या निविदेत मोठे कॉम्पॅक्टरसह एकूण २४६ गाड्या वापरल्या जाणार असून त्यात ४० ई वाहनांचा वापर करण्यात येत आहे. कचरा गाडीत टाकण्यापासून ती गाडी रिती करेपर्यंत प्रत्येक क्षण मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षातून पाहता येत आहे. त्यामुळे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे.

ओला कचरा – ३४० टन,
सुका कचरा – ४१० टन
एकूण कचरा संकलन – ७५० टन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरा वाहतूक व संकलनासाठी ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. ठेक्यानुसार ठेकेदारामार्फत शहरात २४ हजार कुंड्यांचे वाटप केले जाणार आहे. आठवडाभरात या कुंड्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी वाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.- डॉ.अजय गडदे, उपायुक्त घनकचरा विभाग, परिमंडळ १