नवी मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा आता पाच किंवा दहा वर्षांसाठी दत्तक घेता येणार असल्या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आल्याने शासनाविरोधात पालकांचा रोष पाहायला मिळाला. या निर्णयाविरोधात आज रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरु ठेवत पालकांनी निषेध आंदोलन केले. तसेच पालकच शिक्षकांच्या भूमिकेत वर्गात शिक्षक शिकवत असल्याचे चित्र जवळजवळ ७५ पेक्षा अधिक शाळांमध्ये दिसून आले. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच पालक संघटनांकडून पालिकेला याबाबत पूर्व सुचना देण्यात आली होती.

शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही ‘दत्तक योजना’ राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे देणगीदाराने सुचवलेले नाव संबंधित सरकारी शाळेस देता येणार आहे. त्यामुळे अशी योजना आली तर शहरातील देणगीदाराने शाळेस नवीन नाव दिल्यास सध्याचे नाव सदर नावाच्या पूर्वी किंवा नंतर लावता येईल, असंही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात अनेक मान्यवर ग्रामस्थांची नावे शाळेला दिली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेण्याचा स्थितीत आहेत. त्यामुळे आज मुलांसमोर पालकही शाळेत उपस्थित होते. तसेच शिक्षकांचाही या आंदोलनात सहभाग होता.

हेही वाचा : शेती, डोंगर आणि वृक्ष नष्ट होत असल्याने दसऱ्याचे तोरण महागले; भाताचे कणीस, आंब्याची पाने आणि रानफुलं घटली

पालकांनी शिक्षकांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना हस्तकला, चित्रकला, गाणी असे विविध विषय शिकवले. सकाळी दोन तास रविवारची शाळा भरवत शासनाच्या शाळा दत्तक योजनेचा निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच सरकारच्या या योजनेवर विविध स्तरातून तीव्र टीका असताना पालक व विद्यार्थ्यांनीही शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात फलक झळकावत निषेध व्यक्त केला. सरकारी शाळांच्या खासगीकरणाचा हा नवा घाट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे, तर सरकारी शाळांची जबाबदारीही सरकार घेऊ शकत नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने नवी मुंबईत लगबग; सहा लाख चौरस फुटांचा मंडप, चार हजार गाडय़ांची व्यवस्था

देणगीदार शाळांना वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून मदत करतील आणि यासाठी पाच किंवा दहा वर्षांसाठी त्यांना शाळा दत्तक घेता येईल अशी ही योजना आहे. दत्तक योजनेअंतर्गत देणगीदारांना रोख रकमेच्या स्वरुपात देणगी देण्यास परवानगी नाही. केवळ वस्तु आणि सेवांचा पुरवठा करता येणार आहे. तसंच देणगी देताना सरकारी कर नियमांचं पालन करणंही अनिवार्य आहे. परंतु शाळा दत्तक योजनेद्वारे सरकारी शाळाच खाजगी व्यक्तींच्या दावणीला बांधल्या जाणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया पालकांमधून उमटल्याचे चित्र आज शाळांमध्ये होते.

हेही वाचा : राजकीय कार्यक्रमांमुळे होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला फटका; महापालिका बेफिकीर

शाळांच्या इमारीतीची दुरुस्ती, देखभाल आणि रंगरंगोटी करण्यासाठी व्यवस्था विकसित करणे, शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि दर्जा उंचवण्यास मदत करणे, विद्यार्थीसंख्या वाढवणे, शाळांसाठी आवश्यक संसाधने, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच आरोग्य, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञान, क्रीडा, कौशल्य इत्यादी उद्दीष्टे साध्य करण्यासाठी शाळांना दत्तक देण्याची योजना आणल्याचं सरकारचं म्हणणं आहे. परंतू या धोरणातून शाळा काबीज करण्याचा डाव असल्याचा संताप पालक वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या शाळा देणगीदारांचं तसेच शिक्षकांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती शिक्षकांमध्येही आहे . त्यामुळे शाळांमध्ये आज सर्व शिक्षकही उपस्थित होते. नवी मुंबईत मात्र शाळा दत्तक योजनेला आज चांगलाच विरोध करण्यात आला.

हेही वाचा : आयकर विभागाचा अधिकारी म्हणून फोन केला; धाड टाकण्याची धमकी देत २१ लाखांची फसवणूक, सायबर सेलने थेट तामिळनाडूतून केले चतुर्भुज 

“माझी मुलं मराठी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या शाळा उपक्रमशील आहेत. आमच्यासाठी पालिकेच्या शाळा टीकल्याच पाहिजेत. शाळा दत्तक देऊन आमच्या गरिबांच्या मुलांचा शिकण्याचा हक्क शासन हिसकावून घेण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आमचा या शाळा दत्तक योजनेला तीव्र विरोध आहे. नको त्या योजना आणणाऱ्या सरकारचा निषेध करत आहोत. शासनाने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल”, असे पालक संदीप बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : नवी मुंबईत पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक गैरसोयीचे; नव्या वेळापत्रकाबाबत रहिवाशांच्या संमिश्र प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शासनाने जी दत्तक पालक योजना राबवण्याचे धोरण हाती घेतले आहे, त्याला आम्हा सर्व पालकांचा विरोध आहे. जे कोणी शाळा दत्तक घेतील, ते सुरुवातीला एखादे वर्ष मोफत सुविधा देतील. पण पुढे ते त्यांचा शाळेवर होणारा खर्च फीच्या रुपाने घेणार. शाळेच्या वास्तूचा अनेक प्रकारे उपयोग करतील. त्यामुळे गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण होईल. हेआम्हाला मान्य नाही, म्हणून आमचा या दत्तक शाळा देण्याच्या धोरणास विरोध आहे. आता शाळाही विकून खाण्याचा हा प्रकार वाटतोय”, असे पालक शारदा गजानन मानकरी यांनी म्हटले आहे.