पनवेल – तीन दिवसांपूर्वी पनवेल व खारघरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्ध व्यक्तींची लुटमार झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पनवेलमधील तक्का परिसरातील साई लॉज समोरील रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करणारे ७२ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती पायी चालत असताना त्यांनी दुचाकीवरून आलेल्या दुकलीने पोलीस असल्याची बतावणी करुन सव्वा लाख रुपयांचे दागीने लुटले.

कामोठे, खारघर आणि आता पनवेलमध्ये पायी चालणा-या वृद्ध व्यक्तींना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. घराबाहेर मॉर्निंग वॉक किंवा बाजारात खरेदी जाताना अंगात सोन्याचे दागीने घालणा-यांनाच चोरटे लक्ष्य करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. 

पनवेल शहरातील चॅनेल रेसिडेन्सी या सोसायटीत राहणारे आणि सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेले ७२ वर्षीय व्यक्ती नित्यनियमाप्रमाणे गुरुवारी तक्का परिसरातील रस्त्यावरून पायी चालत होते. अचानक साडेआठ वाजता त्यांच्यासमोर दुचाकीवरून दोन व्यक्ती आले. या व्यक्तींनी त्यांची ओळख पोलीस असल्याचे सांगीतले. त्यानंतर पोलीस असल्याची बतावणी करणा-या दोघांनी ७२ वर्षीय व्यक्तींना पनवेलमध्ये चोरांचा सूळसूळाट सुरू असल्याचे माहिती नाही का अशी विचारणा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अंगावर एवढे दागीने घालून का चालताय, हे दागीने आमच्याकडे द्या आणि पोलीस ठाण्यात येऊन परत घेऊन जा’ अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या ७२ वर्षीय व्यक्तींनी त्यांच्याकडील दागीने तातडीने दुकलीच्या ताब्यात दिले. काही क्षणात या दुकलीने तेथून पळ काढला. दागीने परत घेण्यासाठी संबंधित ७२ वर्षीय व्यक्ती पोलीस ठाण्यात आल्यावर त्यांना असे कोणतेही पोलीस अंगावरचे दागीने ताब्यात घेत नसल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीसाठी पोलीस कर्मचारी पाठवले. या घटनेची खातरजमा केल्यानंतर या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.