पनवेल : एका विजेच्या झटक्याने पनवेलच्या चिपळे गावातील आंधळे कुटुंबाचे संसारचक्र उद्धवस्त केले. बारावीची परीक्षा देऊन गुणपत्रिकेची वाट पाहणारा, व्यायामशाळेत शरीर घडवणारा, क्रिकेटच्या मैदानावर गाजणारा अवघ्या १७ वर्षांचा शुभम आंधळे गेल्या पाच महिन्यांपासून कोमाच्या अवस्थेत आहे. त्याच्या डोळ्यांत अजूनही जीवनाची क्षीण ज्योत आहे; पण शरीर निपचित पडले आहे.

१ मे रोजी मंडपकाम करताना विजेचा झटका लागून शुभम गंभीर जखमी झाला. त्याचे वडील कुंडलिक आंधळे तीन आसनी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा सुट्टीत वडिलांना हातभार लावावा म्हणून अंशकालीन मजुरी करत होता, पण ही बाब त्याने आईवडिलांपासून लपवून ठेवली होती. त्या दिवशी मंडपवाल्याने बोलावल्यावर तो कामाला गेला; मात्र त्यानंतर कुटुंबाने त्याचा आवाज पुन्हा ऐकला नाही.

गंभीर भाजल्याने व मेंदूवर जबर मार बसल्याने शुभमला तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन महिने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आतापर्यंत ११ लाख रुपये खर्च करूनही परिस्थिती सुधारली नाही. निधी संपल्याने कुटुंबीयांना त्याला घरी आणावे लागले. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी एक लाखांची मदत केली, तर मंडपवाल्याने अवघे पन्नास हजार रुपये दिले आणि हात वर केले.

८५ किलो वजनाचा धडधाकट शुभमचे वजन आता अवघे ३० किलोंवर आले आहे. मैदान गाजवणारा शुभम आता सहा बाय तीन फुटांच्या खाटेवर नाकावाटे नळीच्या साहाय्याने ‘द्रव आहारावर’ जगत आहे. हातापायांना गंभीर इजा झाली असून तो फक्त डोळे हलवतो. कुटुंबाच्या डोळ्यांसमोर त्याची स्वप्ने चिरडली गेली आहेत.

मदतीची आस

शुभमच्या उपचारासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी वडील कर्जाच्या जोखडाखाली दबले आहेत. भविष्य अंधारमय असताना आंधळे कुटुंब शासन व दानशूर व्यक्तींच्या मदतीकडे आस लावून बसले आहे.