पनवेल : कळंबोली येथील फूडलॅण्ड कंपनीजवळील आदिवासी वाडीतून पाच मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार एका आदिवासी महिलेने पोलिसांकडे सोमवारी रात्री केली होती. या मुलांचा शोध घेण्यासाठी सोमवारी रात्री ते मंगळवारी दिवसभरात तीन वेगवेगळी पथके शोध घेतल्यानंतर ही मुले करंजाडे येथील मामाच्या घरात झोपल्याचे पोलिसांना आढळले. मात्र पोलिसांना पाहून पळून गेलेल्या पाच पैकी दोन मुले पुन्हा शिरढोण येथील त्यांच्या नातेवाईकांकडे लपली होती. अखेर मंगळवारी उशीरा त्यांनाही सुरक्षित कळंबोली पोलिसांनी शोधून काढून पालकांच्या स्वाधीन केले.

मागील चार महिन्यांपूर्वी नवी मुंबईतून मुलांना उचलून घेऊन जात असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून याबाबतचे स्पष्टीकरण दिल्यानंतर नवी मुंबईतील पालकांना दिलासा मिळाला. अशाच एका घटनेमुळे पुन्हा मुलांच्या अपहरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पालकांना काही न सांगता घराबाहेर राहणाऱ्या मुलांमुळे हा प्रसंग घडला आहे. मागील आठवड्यात गुरुवारपासून ते शनिवारपर्यंत घराबाहेर गेलेली मुले घरी न परतल्याने रोडपाली फुडलॅण्ड कंपनीजवळील आदिवासी वाडीत राहणाऱ्या ३७ वर्षीय ताई वाघे यांनी त्यांच्या मुलीसह अजून चार मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार कळंबोली पोलीसांत सोमवारी रात्री दिली.

हेही वाचा…नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांनी या गंभीर प्रकरणातील मुलांच्या शोधासाठी एक अधिकारी व चार कर्मचारी नेमले होते. ताई वाघे यांच्यासह त्यांचे नातवाईक व पोलीसांचे पथक मुलांच्या शोधासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी शोध घेत होते. पेणधर, तळोजा, शिरढोण असे नातेवाईकांच्या घरी शोधल्यानंतर करंजाडे येथील एका नातेवाईकाचे घर शोधल्यावर ही मुले पोलीसांना झोपलेल्या अवस्थेत सापडली. मात्र यामधील दोन मुलांनी त्यांना शोधायला पोलीस आल्याचे पाहील्यावर तेथून पळ काढून धूम ठोकली. मंगळवारी ही मुले शिरढोणच्या नातेवाईकांकडे सापडली. १५ ते १६ वर्षे वयोगटातील ही मुले असून यामध्ये चार मुली व एक मुलाचा समावेश आहे.