नवी मुंबई : वाशी व आसपासच्या भागात रात्रीच्या वेळी पसरत असलेल्या प्रदूषणाच्या धुरक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले व वृद्धांना श्वसनास त्रास, डोळ्यांत जळजळ व घशात खवखव यांसारखे आजार वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबईतील खैरणे, कोपरी गाव, वाशी सेक्टर १९, २६, २८, २९ या भागात रात्रीच्या वेळी शेजारीच असलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वन मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत येथील रहिवाशांनी प्रामुख्याने हा मुद्दा मांडला. या बैठकीस नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर विभागीय अधिकारीही उपस्थित होते. या मुद्द्यावर आक्रमक होत नागरिकांनी येत्या १५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या बाबत वनमंत्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत इशारा देत, “येत्या काही दिवसांत प्रदूषणावर नियंत्रण आले नाही तर कठोर कारवाई केली जाईल,” असे बजावले. नागरिकांच्या तक्रारीनुसार, नजीकच्या औद्योगिक वसाहतीतील झिंक कास्टिंग करणाऱ्या व रासायनिक कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी धूर व रासायनिक वायू सोडला जातो. या प्रदूषणामुळे हवेत उग्र दर्प पसरतो आणि परिसरात दाट धुरकं तयार होतं.

खैरणे आणि वाशी परिसरात प्रदूषणाची समस्या खूपच गंभीर बनली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याने आम्ही वनमंत्री गणेश नाईक यांना साकडे घातले. – मुनावर पटेल, माजी नगरसेवक, कोपरखैरणे