नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता अंतिम टप्प्यात आले असून या विमानतळाची नवी दृश्ये आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊ लागले आहेत.

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या विमानतळाचे लोकार्पण येत्या ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील ग्रीनफील्ड प्रकल्प म्हणून उभ्या ठाकलेल्या या विमानतळाची टर्मिनल रचना भारताच्या राष्ट्रीय फुलावर म्हणजेच कमळावर आधारित आहे. नव्याने समोर आलेल्या विडिओमध्ये विमानतळाच्या आतील भागातील भव्य प्रासादासारखी रचना, चमचमणारे फ्लोरिंग, उंच छतावरील कलात्मक लुक, ग्रीन झोन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलेल्या अत्याधुनिक प्रतीक्षागृहांचे दृश्य डोळे दिपवून टाकणारे आहे. विमानतळाच्या बाहेरील परिसरही हिरवळीने नटलेला असून, पर्यावरणपूरक रचना हा प्रकल्पाचा आणखी एक ठळक पैलू आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेला हा विमानतळ प्रकल्प पाच टप्प्यांत पूर्ण होणार आहे. यात चार प्रवासी टर्मिनल, कार्गो पायाभूत सुविधा, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स (CTC), एटीसी टॉवर, जनरल एव्हिएशन टर्मिनल तसेच देखभाल-दुरुस्ती केंद्र (MRO services) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या विमानतळावर दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

नावाविषयी संभ्रम कायम

या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे. “२३ सप्टेंबरपर्यंत नावाबाबतचे नोटिफिकेशन निघाले नाही, तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊन तीव्र आंदोलन करू. आमचे पाच हुतात्मे झालेत, आणखी बलिदान द्यावे लागले तरी मागे हटणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्ते नेते नारायण म्हात्रे यांनी दिला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून ठरवलेल्या दिवशी मुंबई बंदची हाकही दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतसा या विमानतळाचे नाव कोणत्या नेत्याच्या नावावर होणार, याबाबतची उत्सुकता आणि तणाव वाढताना दिसत आहे.