उरण : जेएनपीए बंदरावर आधारित – एसईझेडमधील नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेण्यासाठी जेएनपीएने सेझमधील उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी गुरुवारी जेएनपीए कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सेझ जागर मेळाव्यात केली. यामध्ये महत्वाच्या पदावर भूमिपूत्र रुजू होतील, अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा आग्रह धरण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेएनपीएकडून बंदरावर आधारीत सेझ प्रकल्प उभारला जात आहे. एकूण ७०० एकर भूखंडावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. यातील ३०० एकर जमिनीवर प्रकल्पासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, तर ४०० एकरावर विविध प्रकारच्या उद्योगांची उभारणी केली जाणार आहे. याची सुरुवात झाली आहे. बंदरातील दुबई पोर्ट या खाजगी बंदराच्या ८८ एकर भूखंडावर न्हावा शेवा बिजनेस पार्कच्या माध्यमातून गोदाम तयार करण्यात आले आहेत. यातील नोकरभरतीला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया, फार्मा, कोल्ड स्टोरेज, पॅकेजिंग आदी उद्योगही निर्माण होणार आहेत. या उद्योगात भूमिपूत्र व स्थानिकांना कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – अमृत योजनेअंतर्गत प्रक्रियायुक्त पाणी विक्रीसाठी नवी मुंबई महापालिकेचा पुढाकार

यामध्ये नोकर भरती करीत असतांना प्रथम ज्या गावांची जमीन या प्रकल्पासाठी संपादीत झाली आहे, त्यांना प्राधान्य त्यानंतर जेएनपीटी बाधित गावे, सिडको बाधित परिसर व उर्वरीत संपूर्ण उरण तालुका, असा क्रम ठरविण्याची सूचना करण्यात आली आहे. आत्तापर्यंतच्या नोकर भरतीसाठी भूमिपुत्रांना लाखो रुपये मोजावे लागले आहेत. ही स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, प्रत्येक भूमीपुत्राला त्याचा नोकरीचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मेळाव्याकडे तरुणांची पाठ

या मेळाव्याला बेरोजगार व तरुणांऐवजी त्यांच्या पालकांनीच हजेरी लावली होती. त्यामुळे, ज्या तरुणांना रोजगाराच्या संधीची आवश्यकता आहे. तेच या मेळाव्याला अनुपस्थित होते.

हेही वाचा – नवी मुंबई : शिष्यवृत्ती फार्म ऑफलाईन बंद; ऑनलाईनसाठीही समस्यांचा डोंगर

७७ हजार रोजगार निर्मितीचा दावा

जेएनपीएने बंदरावर आधारीत सेझमध्ये येत्या पाच वर्षांत ४ हजार कोटींची गुंतवणूक होऊन ७७ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा केला आहे. या मेळाव्यात एल.बी. पाटील, भूषण पाटील, गोपाळ पाटील, दिनेश पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार, महादेव घरत, विजय पाटील आदी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले, तसेच सूचनाही केल्या.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpa should setup industry based training center for youth demand in sez jagar gathering uran raigad ssb
First published on: 12-01-2023 at 18:23 IST