उरण : जेएनपीए, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीएमध्ये अत्याधुनिक शिक्षण व विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे लॉजिस्टिक्स कौशल्यविकास क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या केंद्रात पाच वर्षांच्या कालावधीत २५ हजारा हून अधिक एचएमव्ही/एलएमव्ही चालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना निवासी व गैर-निवासी स्वरूपात मोफत, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने व अभिमानाने साजरा केला.
हा कार्यक्रम जेएन प्राधिकरण प्रशासन भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जे एन बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष शरद वाघ हे उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याचा आणि समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी जे एन बंदर प्राधिकरणाच्या संचालक मंडळाचे सदस्य, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य अतिथींनी सीआयएसएफ कमांडंटकडून गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केले आणि उपस्थितांनी एकसुरात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करताना उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना दाटून आली होती.
स्वातंत्र्याच्या उत्सवाच्या या प्रसंगी, जेएनपीएला अभिमान आहे की ते भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असून उत्कृष्ट कार्यप्रणाली व जागतिक दर्जाच्या सेवांच्या माध्यमातून भारताचे नाव जागतिक स्तरावर गौरवाने उजळवत आहे. वाढवण बंदरासारख्या आगामी प्रकल्पांद्वारे, आम्ही भारताच्या सागरी क्षमतांना अधिक बळकटी देऊन आपली जागतिक पातळीवरील व्यापार वाढविण्यास सज्ज आहोत. तसेच हरित तंत्रज्ञानाचा अवलंब, कार्बन उत्सर्जनात घट आणि कार्यक्षमता वृद्धी करून पर्यावरणपूरक बंदर संचालनात नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच, कौशल्यविकास आणि बंदरभेटीद्वारे सागरी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही आम्ही विशेष भर देणार आहोत, जेणेकरून भारताच्या सागरी क्षमतांचा विकास होईल व पुढील पिढीला प्रेरणा मिळेल असे वाघ यांनी यावेळी व्यक्त केले. या केंद्रात पाच वर्षांच्या कालावधीत २५,००० हून अधिक एचएमव्ही/एलएमव्ही चालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना निवासी व गैर-निवासी स्वरूपात मोफत, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी आरटीओ, एएसडीसी, आयआरयू आणि इतर संस्थांकडून प्रमाणपत्र दिले जाईल, ज्यामुळे चालकांना जागतिक स्तरावरील मान्यता मिळेल आणि जीसीसी, युरोप, जपान तसेच भारतातील रोजगाराच्या संधींसाठी ते सज्ज होतील. या कार्यक्रमाला वायसीएमओयूचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त, जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) देशव्यापी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमातून कर्मचारी, हितधारक आणि पत्तन परिवारास आपल्या घरांवर तसेच बंदर परिसरात अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकविण्यास प्रेरित केले.
स्वातंत्र्य आणि लोकशाही या मूल्यांचे जतन करण्याची प्रेरणा देत, उपस्थितांच्या मनात देशाभिमान आणि ऐक्यभाव रुजवत हा सोहळा संपन्न झाला.