पनवेल : खारघर उपनगरामध्ये रहिवाशांना पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यानंतर पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रश्नी पुढाकार घेतला आहे. सिडकोच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून न राहता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खारघरलगत असणाऱ्या ओवे तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी टंचाई भासत असलेल्या परिसरात देण्याचे नियोजन आयुक्तांनी आखले आहे.
या महत्त्वाच्या पाणी प्रश्नाविषयी गुरुवारी पनवेल महापालिकेच्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. तलावातील पाण्याचा शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी पुरवठा यंत्रणा उभारण्याच्या विषयाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे पुढील सहा महिन्यांत या तलावातील पाणी ओवे गाव, ओवे कॅम्प आणि खारघरच्या टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जाणार आहे.
ओवे गावालगत ०.१६ दश लक्ष घनमीटर एवढ्या क्षमतेचे लहान धरण आहे. महापालिका स्थापनेपूर्वी तळोजा ग्रामपंचायतीचे हे धरण होते. याच धरणातून गुरुत्वाकर्षणाने हे पाणी तळोजा गावाला पुरवठा केले जात होते. पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर व ओवे गाव आणि ओवे कॅम्प हा परिसर येत असला तरी सिडको वसाहतींमधील पाणी पुरवठा सेवा अद्याप सिडकोने पनवेल महापालिकेला हस्तांतरित केली नाही. त्यामुळे सिडको मंडळावर खारघर व परिसरावर पाणी पुरवठा कऱण्याची जबाबदारी आहे. सध्या महापालिकेने पाच पाण्याचे टँकर या परिसरात पाणी पुरवठा कऱण्यासाठी सिडको मंडळाकडे दिले आहेत. मात्र सुमारे ८ दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याचा तुटवडा भासत असल्याने पाच दिवसात ४० एमएलडी पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी सिडकोला वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत.
प्रस्ताव काय?
- दिवसाला २ एमएलडी शुद्ध पाणी मिळण्यासाठी पॅकेज ट्रीटमेंट प्लान्ट उभारून तसेच हे शुद्ध पाणी केल्यानंतर ते सिडकोच्या जलवाहिनीमध्ये आणि नजीकच्या ओवे गाव व कॅम्पपरिसरातील जल जोडण्यापर्यंत नेण्यासाठी सुमारे १७४० मीटर लांबीच्या जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पनवेल महापालिकेने बनवला आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी महापालिका खर्च करणार आहे.
- या पॅकेज ट्रीटमेंट प्लान्टमधून दिड एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण होऊ शकणार आहे. तसेच सध्या ओवे कॅम्प व गावात ५० हजार लीटर क्षमतेचे जलकुंभ आहे. येथील रहिवाशांच्या नेहमी कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याची तक्रार असते.
- महापालिका दोन कोटी रुपये खर्च करून साडेचार लाख लीटर क्षमतेचे पाणी साठवणुकीचे जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेणार असल्याचे सुद्धा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगीतले.