पनवेल : अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या खारघर येथील महापौर निवासाच्या इमारतीच्या कामासाठी मागवलेल्या वीज साहीत्यांची चोरी झाल्याची घटना खारघर पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल करण्यात आली. या महापौर निवासाच्या बांधकामातून एक लाख रुपयांची केबल व इतर साहीत्य चोरी झाली असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.
खारघर येथील सेक्टर २१ येथील भूखंड क्रमांक १५१ येथे पनवेल महापालिका महापौर निवास बांधत आहे. या महापौर निवासाचे काम अंतिम टप्यात आहे. २८ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान ही चोरी झाल्याची नोंद नेरूळ येथे राहणा-या गरजितसिंग रहलोवालिया यांनी दिली आहे. महापौर निवासाच्या कामासाठी आणलेल्या वीज साहीत्यापैकी १२ तांब्याच्या पट्या आणि १८ विजतारा निवासाच्या काही अंतरावर ठेवल्या होत्या. तेथून या वस्तू चोरी झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या फीर्यादीत म्हटले आहे.
गेली अनेक वर्षे पनवेल महापालिकेच्या महापौर निवासाचे बांधकाम सुरू आहे. महापौर निवासाचा भूखंड क्षेत्र वाढल्याने कामात वाढ झाली. भविष्याचा विचार करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार करून विमानतळाला खेटून असलेल्या महापालिकेचे महापौर निवास आणि निवासासोबत अतिथीगृह हे भव्य असावे यासाठी महापालिका प्रशासनाने २५ गुंठे क्षेत्रात हे निवासाचे बांधकाम हाती घेतले. या निवासाचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिले आहे. १७ कोटी रुपये खर्च करून बांधत असलेल्या या महापौर निवासाचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सध्या स्थापत्य विभागाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून, विजेचे काम अंतिम टप्यात आहे. तर या इमारतीचे सूतारकाम आणि बागेचे काम सुरू आहे. यापूर्वी सुद्धा अनेकदा महापौर निवासाच्या बांधकामात चोरट्याचा फटका कंत्राटदारांना सहन करावा लागला आहे.
