पनवेल – आंतरराष्ट्रीय क्रीकेटमध्ये देशाचे व स्वताचे नाव उंचावून क्रीकेटला दिल्ली ते गल्लीपर्यंत पोहचविणारे क्रिकेटवीर सुनील गावसकर यांनी नूकताच दोनशे धावांच्या व्दिशतकापूढे अजूनही मोठा आनंद असतो असे भाष्य केले आहे. खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर रुग्णालयाचे गावस्कर हे ट्रस्टी आहेत. खारघर येथील याच रुग्णालयाने मागील ५ वर्षांत श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयामध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने अनेकांना या रुग्णालयामध्ये नवसंजीवनी मिळाली आहे.

बुधवारी याच रुग्णालयामध्ये एका समारंभात गावस्कर यांनी त्यांचे मत प्रसारमाध्यमांसमोर मांडले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने हृदयविकाराने त्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारलेल्या १० कोटी रुपयांचा निधीतून ६१९ बालकांवर शस्त्रक्रीया करता आल्याने रोटरी क्लब संस्थेच्या कार्याविषयी क्रिकेटवीर गावसकर यांनी कौतुक केले.  

गावसकर यांनी स्वता:चा रुग्णालयातील पालकांविषयीचा अनुभव यावेळी सांगीतला. जन्मजात हृदयाला छिद्र असलेल्या बालकांसाठी त्यांचे पालक अगोदरच चिंतेत असतात. बहुतांश पालक गावखेड्यातून नवी मंबईकडे पहिल्यांदाच आलेले असतात. तसेच आर्थिक विवंचनेमधील असणारे पालक ज्यावेळेस नवी मुंबई (खारघर) येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी येतात, त्यावेळेस पहिल्यांदा त्यांना रुग्णालयाशेजारी असणा-या उंच उंच टॉवर पाहून ते थक्क झालेले असतात.

अशा बिथरलेल्या स्थितीतील पालकांना ज्यावेळेस त्यांच्या बालकांवरील औषधोपचार व शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टर बालकाची शस्त्रक्रीया यशस्वी झाली असल्याचे सांगतो. त्यावेळेस यापूढे आपलेही बालक इतर सर्वसामान्य बालकांप्रमाणे दिर्घायुषी होईल हा आनंदाने पालकांच्या चेह-यावरील अत्यानंद हा क्रिकेट सामन्यात दोनशे धावा केलेल्या व्दिशतकापेक्षा अधिक मोठा वाटतो, अशी आठवण क्रिकेटवीर सुनील गावसकर यांनी खारघर येथे मनमोकळेपणाने सांगीतली. या धाडसी मुलांना भेटणे खरोखरच हृदयस्पर्शी वाटते. त्यांचे धाडस आणि रुग्णालय व्यवस्थापन आणि रोटरी सारख्या संस्थेच्या निःस्वार्थ मदतीमुळे प्रेरणादायी भावनेतून एखाद्याचे अमुल्य जीवन वाचविता येते याची प्रचिती या वास्तुमधून मिळत असल्याचे गावस्कर म्हणाले.      

हृदयविकार असलेल्या बालरुग्णांवर शस्त्रक्रिया ही एक आव्हानात्मक व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हृदयातील छिद्रे, ऱ्हदयाच्या झडपांसंबंधीत समस्या किंवा असामान्य रक्तवाहिन्या यासारख्या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. यावर वेळीच उपचार न केल्यास दम लागणे, मुलांची वाढ खुंटणे, वारंवार संसर्ग होणे आणि अकाली मृत्यू यासारख्या गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. 

प्रत्येक मुलाला निरोगी हृदयासह जगण्याची संधी मिळायला हवी. आपल्या देशातील अशी अनेक मुलं आहेत जी कोणत्या ना कोणत्या ऱ्हदयविकाराशी झुंजत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांना या आजाराशी शेवटच्या श्वासापर्यंत लढावे लागते. ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ उपक्रमाद्वारे, अशा बालरुग्णांपर्यंत पोहोचण्याता प्रयत्न आम्ही करत आहोत. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा मी एका मुलाला हसताना पाहतो तेव्हा मला कळते की आम्ही त्यांना उपचाराबरोबरच नव्या आयुष्याची भेट दिली आहे. हे दान नसून हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. – नितीन मेहता, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट आणि गिफ्ट ऑफ लाईफ प्रकल्प 

हृदयविकाराने जन्माला येणारे बाळ अनेकदा कमकुवत दिसतात, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, ते पुरेसा आहार घेऊ शकत नाही किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांची त्वचा निळसर पडते. जन्मजात हृदयविकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात जीवघेण्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही बाळांना जन्मानंतर काही आठवडे किंवा काही महिन्यांत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. वेळीच निदान, जन्मानंतर केले जाणारे स्क्रीनिंग किंवा इकोकार्डियोग्राम तपासण्या यात महत्त्वाची भूमिका बजावतात. – डॉ. प्रभात रश्मी, वरिष्ठ सल्लागार, श्री सत्य साई संजीवनी रुग्णालय