या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुलीवर वा शेगडीवर उकळणाऱ्या मटणाचं पाणी. पावणेरावळे घरी आले की मुख्य मेजवानीला सुरुवात होण्याआधी ‘स्टार्टर’ म्हणून या रश्शाला मोठी पसंती. यात चुकूनमाकून चार फोडी जर का आली त्यांचाही आस्वाद भुरकत भुरकत घेता येतो. घरभर मसाल्याच्या घमघमाटानं भुकेनं धरलेला ताल मग हा नादखुळा रस्सा अधिकच द्रुतगतीला आणतो.

लुसलुशीत मटणाला पातेल्यात चरचरीत फोडणी आणि त्यानंतर पाणी टाकून उकळी आल्यानंतर तेलतवंग, र्ती किंवा कट म्हणा. तो असा अलगद मोठय़ा वाडग्यात घेऊन भुरकायचा जबरा नाद म्हणजे खुळा रस्सा. हो, खुळा रस्सा! रंगाने पांढराफेक म्हणून याला नावच खुळा रस्सा पडलेलं. या रश्शात दुसरं काही नाही. निव्वळ फोडणीचं पाणीच. चुलीवर वा शेगडीवर उकळणाऱ्या मटणाचं पाणी. पावणेरावळे घरी आले की मुख्य मेजवानीला सुरुवात होण्याआधी ‘स्टार्टर’ म्हणून या रश्शाला मोठी पसंती. यात चुकूनमाकून चार फोडं जर का आली तर तीही भुरकत भुरकत पोटात जातात. घरभर मसाल्याच्या घमघमाटानं भुकेनं धरलेला ताल मग हा नादखुळा रस्सा अधिकच द्रुतगतीला आणतो.

आता फोडं म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. फोडं म्हणजे मटणाचे लहानमोठे ‘पीस’. रश्शात यांची उपस्थिती तशी कमीच. खुळ्या रश्शात ते अर्धेकच्चे शिजलेले असतात. या रश्शाचे हे ‘रॉ’पण अधिकच मजेदार असते. या अध्र्याकच्च्या फोडांना संपवण्यासाठी थोडीशी दातांना धार काढावी लागते. मग हळूहळू मजा येऊ लागते.

जेवणाच्या ताटावर जे काही करायचं ते एका हातानंच, अशी भोजनसंस्कृती! पण इथे मात्र मटणाच्या ‘पीसेस’शी दोन हात करावे लागतात. म्हणजे दोन्ही हातांनी खायची तयारी ठेवावी लागते. मासांहाराने मिळणाऱ्या ताकदीचा हा असाही एक फायदा येथे होतो.  ही झाली रश्शाची कथा. आता रश्शासोबत भातही येतो बरं! यालाच रस्साभात म्हणतात. भात तयार झाला की त्यात मटणाचा उरलेला रस्सा ओतायचा. म्हणजे मसालेभातात जशा अनेक भाज्या टाकल्या जातात. तशीच याची ‘रेसिपी’. रश्शाचा सारा अर्क भातात मुरला की, तो अप्रतिम चवीला उतरतो. त्यानंतरचा याचाच दुसरा अवतार म्हणजे काळाभात. सुकं खोबरं खरपूस भाजून झालं की, काळा भात ताटात अवतरतो. त्याहीआधी घशाला पायासूप हवंच. याचं रूपडंही खुळ्या रश्शाशी मिळतंजुळतंच, पण यात चवीला लवंग, कोथिंबीर आणि वेलचीची सोबत. या पायासूपचा चरका जिभेला बसला की ती कोल्हापूरच्या चवीची आठवण होतेच!

हा ठसका का? तर त्यालाही एक खास कारण आहे. ‘अहो आम्ही पंजाबी मसाल्यातले मटन-चिकन खातोयच की, पण अस्सल चवीचं काय? या प्रश्नाला उत्तर म्हणून पनवेलमधील खवय्यांसाठी खास पश्चिम महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाची मेजवानी देण्यासाठी नवीन पनवेल सेक्टर-१ मध्ये ‘कोल्हापुरी मराठा’ हे छोटंसं हॉटेल उभं राहिलं आहे.

रोहिणी घोणे यांचा तिखट चवीमागे मोठा हात आहे. खरं तर मांसाहाराला पंजाबी, केरळी आणि कोकणातल्या खास चवी आहेत. तशी पश्चिम महाराष्ट्राची वैशिष्टय़पूर्ण तिखट चव आहे. या चवीला वाहिलेली भोजनालयं नवी मुंबई, पनवेलमध्ये काही ठिकाणीच पाहायला मिळतात.

कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागात खास अनेक रस्सा मंडळं आहेत. या मंडळांतील सर्व सदस्य मिळून पैसे काढून तांबडा आणि पांढरा रस्सा याशिवाय मटनाचं सुकं आणि भाकरी आणि भाताचा बेत असतो. नदीकाठचा कुठलाही प्रदेश शोधून मग वनभोजनाचा सोहळा पार पडतो.  कुटुंबातील सदस्यांसाठी घाटी मसाल्यात वेगवेगळ्या पदार्थाची मेजवानी खाऊ घालणाऱ्या रोहिणी यांनी थेट हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी रश्शांवर अधिक भर दिला. तांबडा आणि पांढरा रस्सा ही त्यांची ओळख आहेच. मटनातील या दोन रश्शांखेरीज खुळा रस्सा, पाया रस्सा आणि त्यासोबत काळ्या भाताची जोड दिली आहे. यात तिखटाची मात्रा म्हणजे झणझणीतपणा अधिक असतो, कारण कोल्हापुरी पद्धतीच्या कोणत्याही मांसाहारी पदार्थातून तिखट वजा केले तर खवय्यांच्या इथे येण्याला काही उद्देश राहत नाही. म्हणून मसाल्यांची तयारी अधिक काळजीपूर्वक करावी लागते. त्यामुळे ‘कोल्हापुरी मराठा’च्या मुदपाकखान्याची संपूर्ण मदार रोहिणी यांच्यावर आहे. एरवी कुठल्या तरी चायनीज गाडय़ांवर राइस आणि नुडल्सला ‘अजिनामोटो’ची भगभगीत फोडणी देत उभ्या असलेले नेपाळी आचारी रोहिणी यांना मदत करीत असतात. यातील दोन नेपाळी याच मुदपाकखान्याचे सध्या ‘कोल्हापुरी बल्लव’ आहेत. त्यांच्या हातात आताशा कोल्हापुरची चव पुरेपूर उतरली आहे. ‘कोल्हापुरी मराठा’मध्ये चव कायम राखण्यासाठी मटनाचा दर्जा कसोशीने तपासून घेतला जातो. या कामात मुकेश शहा आणि राहुल काष्टे हेही मदत करतात.

‘कोल्हापुरी मराठा’चे खास वैशिष्टय़ म्हणजे ‘स्पेशल मटन डिश’ यात पांढरा-तांबडा रस्सा, मटन सुक्का, मटन खिमा, अंडं, बिर्याणी राइस आणि ज्वारीची (जोंधळ्याची) वा तांदळाची भाकरी अशी पदार्थाची चढती भाजणी आहे. याशिवाय तंदुरी रोटी व चपाती असे पर्यायही आहेत. ‘स्पेशल चिकन डिश’मध्ये अशीच रचना आहे. विशेष म्हणजे ‘स्पेशल फिश डिश’मध्येही तांबडा रश्शाची संगत आहे. यात फिश फ्राय आणि फिश मसाला चाखता येईल. सोबत दह्य़ातील कांदा चवीत आणखीनच भर घालतो. ग्राहकांचा तिखट रश्शासाठीचा आग्रह असतो. त्यामुळे ‘कोल्हापुरी मराठा’मध्ये रश्शाचे वैविध्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे रोहिणी यांनी सांगितले.

कोल्हापुरी मराठा

  • कुठे – सेक्टर-१, नवीन पनवेल
  • कधी- दुपारी १२ ते ३.३० सायंकाळी ७.३० ते रात्री ११.००
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapuri maratha in new panvel kolhapuri special dishes
First published on: 24-06-2017 at 01:36 IST