कोपरखरणे सेक्टर ११, जॉगिंग ट्रॅक

वेगवान जीवनशैलीत मित्रांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ मिळणे अशक्यच! पण कोपरखैरणेच्या सेक्टर ११ मधील जॉगिंग ट्रॅक आणि उद्यानात ही अशक्य गोष्ट शक्य होताना दिसते. पहाटे वॉक करता करताच तिथे विविध सामाजिक उपक्रमांपासून, यात्रा-सहलींपर्यंत विविध बेत होतात आणि त्यांची अंमलबजावणीही केली जाते. त्यामुळे कोपरखैरणेतील हा जॉगिंग ट्रॅक मैत्रीचा ट्रॅक ठरत आहे.

रस्त्यांवरची वर्दळ वाढून धूर-धुळीने हवा प्रदूषित होण्यापूर्वीच पहाटेच्या शुद्ध हवेत मोकळा श्वास घेता यावा म्हणून अनेकजण पहाटे फेरफटका मारायला जातात. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या नवी मुंबईकरांना जॉगिंगसाठी हक्काची जागा मिळावी, म्हणून कोपरखैरणे सेक्टर ११ येथे जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या दरुगधीत जॉिगग करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे.

शहरात मोकळी जागा पुरेशी शिल्लक नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणेच्या सेक्टर ११ मध्ये नाल्याच्या किनारी एक ७०० मीटरचा जॉिगग ट्रॅक बांधला. ट्रॅकशेजारी उद्यानही तयार करण्यात आले. हे ठिकाण सध्या परिसरातील रहिवाशांचे व्यायाम आणि भेटीगाठींचे ठिकाण बनले आहे. कोपरखरणे, बोनकोडे, फाम सोसायटी, कोपरी गावातील रहिवासी इथे येतात. पहाटे पाचपूर्वीच येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची वर्दळ सुरू होते, ती साधारण सकाळी ७.३० पर्यंत कायम असते. जॉगिंग करणाऱ्यांची गर्दी कमी झाली की परिसरातील ज्या रहिवाशांकडे पाळीव कुत्रा आहे ते आपापल्या कुत्र्यांना घेऊन उद्यानात येतात. कुत्र्यांना खेळायला सोडून ते व्यायाम करतात. तेवढय़ा वेळात हे पाळीव कुत्रे एकमेकांशी खेळतात. येथील झाडांवर सकाळी विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो.

मॉर्निग वॉकसाठी येणारे साईनाथ भोईर सांगतात, ‘आम्ही रोज या ठिकाणी मॉर्निग वॉकसाठी येतो. इथे नियमित येणाऱ्यांचे परस्परांशी मैत्रीचे बंध जुळले आहेत. दिवसभर कामाच्या वेळेत मित्रांना भेटायला वेळ मिळत नाही. सकाळच्या वेळी मॉर्निग वॉकसाठी आल्यावर व्यायम होतो, दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होते आणि मित्रांना भेटल्यामुळे प्रसन्न वाटते. सकाळ व संध्याकाळचे दोन वेगळे ग्रुप आहेत. मला सकाळी येता आले नाही, तर मी संध्याकाळी येतो. जॉगिंग व्यायाम करून झाले की सहलींची आणि सामाजिक उपक्रमांची चर्चा होते. हे बेत अमलातही आणले जातात. रोजच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन चर्चा होतात,

त्यामुळे मन प्रसन्न होते. दरवर्षी आमचा ग्रुप अमरनाथ यात्रे जातो. त्याचे नियोजन हे सकाळी जॉगिंगनंतरच होते. स्वच्छता अभियानासारखे विविध उपक्रमही आम्ही राबवतो.’

उद्यानात पिण्याच्या पाण्याची व ओपन जिमची सोय करणे, शौचालय उभारणे आवश्यक आहे, असे मत येथे येणारे व्यक्त करतात. उद्यान दिवसभर सुरू असल्यामुळे उन्हाळ्यात दुपारी विश्रांती घेण्यासाठी छत असणारी जागा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक तिथे बसू शकतील. उद्यानातील बाके तुटली आहेत. ती बदलण्यात यावीत, अशीही येथे फेरफटका मारणाऱ्यांची मागणी आहे.

रासायनिक सांडपाण्याची दरुगधी

नवी मुंबईची रचना ही एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खाडी अशी आहे. एका बाजूला एमआयडीसी तर दुसऱ्या बाजूला सिडको वसाहत आहे. एमआयडीसीतील कंपन्यामधील सांडपाणी खाडीत सोडण्यात येते. हे सांडपाणी वाहून नेणारा नाला सिडको वसाहतीमधून जातो. शहरात पुरेशी जागा नसल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ येथे नाल्याच्या बाजूला ७०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक उभारला आहे. या जॉगिंग ट्रॅकला लागूनच उद्यान आहे. पण या उद्यानाकडे पालिकेने लक्ष न दिल्यामुळे त्याची अवस्था दयनीय झली आहे. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यातून रात्री कंपन्यांमधील रासायनिक पाणी सोडले जाते. त्याचा दरुगध पहाटेपर्यंत परिसरात पसरलेला असतो. पहाटे ५ च्या आधी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना ही दरुगधी सहन करतच चालावे लागते.

पालिकेने सुसज्ज जॉगिंग पार्क बनवले आहे. या उद्यानाची आणि ट्रॅकची साफसफाई केली जात नाही. इथे शौचालय उभारणे गरजेचे आहे. उद्यानात रात्री मद्यपान केले जाते. मद्यपींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.

अशोक चंद्रा, नागरिक

रोज चालल्यामुळे अनेकांशी मैत्री झाली आहे. उद्यानात अनेक गैरसोयी आहेत. पालिकेने उद्यानाचा कायापालट करणे गरजेचे आहे. या भागात व्यायाम आणि फेरफटक्यासाठी जागा नसल्यामुळे जॉगिंग ट्रॅकशिवाय पर्याय नाही. हे उद्यान सुसज्ज केल्यास आंनद होईल.

वैभव म्हात्रे, नागरिक

सकाळी चालल्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता. पण सकाळी तासभर चालणे सुरू केल्यापासून हा त्रास जास्त जाणवत नाही.

असुतोष स्वयुन, नागरिक