गणेश मंदिर, कोपरी गाव तलाव, कोपरी
तलावाचे सान्निध्य, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ यामुळे कोपरी गाव तलाव हे परिसरातील आरोग्यासाठी आग्रही असणाऱ्यांचे आवडते ठिकाण ठरले आहे. या परिसराचा पालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात आला आहे. तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत उद्यान साकारले आहे. सकाळी आणि संध्याकाळी तिथे व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी अनेक जण येतात.
तलाव परिसरातील हिरवळीवर अनवाणी चालण्याचा आनंद घेणे अनेकांना आवडते. परिसरात लावण्यात आलेल्या मुबलक वृक्षांमुळे विविध प्रकारचे पक्षी तलावाकाठी गर्दी करतात. पहाटे आणि संध्याकाळी त्यांचा किलबिलाट ऐकण्याची संधी इथे येणाऱ्यांना मिळते. उत्तम आरोग्यासाठी रोज काही वेळ चालण्याचा व्यायाम आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्व वयोगटांतील लोक इथे फेरफटका मारण्यासाठी येतात. काही जण मोकळ्या जागेत व्यायाम, योगासने करतात.
पूर्वी या तलावाच्या परिसरात कोणीही येत नसे. पण उद्यानाचा कायापालट झाल्यापासून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. तलावाच्या भोवती ५०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. तिथे उत्तम प्रतीच्या लाद्या बसवण्यात आल्या आहेत. घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱ्या या शहरात अनेक पालकांना आपल्या मुलांसाठी खास वेळ काढता येत नाही. अशा पालकांसाठी तर हा तलाव परिसर वरदान ठरला आहे. पालक आपल्या मुलांना इथे घेऊन येतात. त्यामुळे मुलांनाही उद्यानात मोकळ्या हवेत खेळण्याची संधी मिळते आणि पालकांना व्यायामही घडतो. ज्यांना संध्याकाळी मुलांना फिरायला नेण्यासाठी वेळ मिळत नाही, ते पालक सकाळी येथील उद्यानात मुलांना आणतात. पहाटे पाचपासून येथे वर्दळ सुरू होते. किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांना नागरिक दाणे देतात. तलावातील माशांना खाद्य देतात. इथे आकाशात भरारी घेणारे थवे पाहायला मिळतात.
गैरसोयींचे प्रमाण वाढते
व्यायाम केल्यांनतर विश्रांती घेता यावी म्हणून पालिकेने येथे बाक बसवले आहेत. सुरुवातीला अनेक वयोवृद्ध या बाकांवर बसून गप्पा मारताना आणि विश्रांती घेताना दिसत. पाऊस पडत असताना कुठे थांबायचे, असा प्रश्न इथे येणाऱ्यांना पडतो. झाडाखालीच आसरा घ्यावा लागतो. तलावाच्या काठांवर शेवाळ साचले आहे. पाण्यामध्ये निर्माल्य टाकण्यात येते. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उद्यानामध्ये प्रसाधनगृह नसल्याने गैरसोय होते. उद्यानात सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे रात्री मद्यपींचा अड्डा जमतो.
सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना मद्याच्या बाटल्या दिसतात. काही वेळा फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पडलेल्या असतात. त्या लहान मुलांच्या पायांत रुतून त्यांना जखम होण्याची शक्यता आहे. काही जण येथे कुत्र्यांना घेऊन येतात. त्यांचाही त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. उद्यानामध्ये अॅम्फिथिएटर साकरण्यात आले आहे. पण त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
सकाळी ताज्या हवेत फेरफटका मारण्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते. व्यायामशाळेत जाऊन पैसे भरून व्यायाम करण्यापेक्षा सकाळी तासभर तरी मोकळ्या हवेत चालल्यास मन आणि शरीर दिवसभर प्रसन्न राहते.
– दिलिप जगदाळे
सकाळी हिरवळीवर अनवणी चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. मला रोज सकाळी चालण्याची सवय आहे, पण काही कारणास्तव सकाळी फेरफटका मारता आला नाही, तर दिवसभर चुकल्यासारखे वाटते.
– लीला मित्रा
त्र उद्यानात एकाही ठिकाणी छत उभारण्यात आले नसल्यामुळे पावसाळ्यात गैरसोय होते. झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे उद्यानात उभे राहण्यासाठी छत बनण्यात यावे. विश्रांतीसाठी बसवलेले बाक तुटले आहेत. ते दुरुस्त करण्यात यावेत.
– अनिल गुप्ता
सकाळी वेळ मिळाला नाही, तर संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येतो. इथे फेरी मारल्यावर प्रसन्न वाटते. दिवसभराचा थकवा दूर होतो.
– वसंत धामनदे
शरीर सक्षम ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करते. दिवसभर वातानकूलित ठिकाणी काम करत असल्यामुळे शरीरातून घाम बाहेर निघत नाही. पण सकाळी चालल्याने मन प्रसन्न राहते. आणि दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
– ममता राज