उरण : गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रानसई धरण वाहने बंद झाले आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे उरणकरांच्या पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे जून महिन्याच रानसई भरून वाहू लागले आहे. रानसई धरणाची साठवणूक क्षमता घेटल्याने उरणच्या नागरिकांना नोव्हेंबर महिन्या पासूनच पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मात्र पावसाळ्यात चार महिने होणाऱ्या पावसामुळे धरणात पाणी पातळी कायम राहण्यास मदत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धरणातील ओसंडून वाहणारे पाणी बंद झाले आहे.
एकीकडे धरण भरल्याने जादा वाहणाऱ्या रानसई मधील पाणी कधी अडणार असा प्रश्न आता उभा राहिला आहे. मात्र रानसईच्या उंची वाढीचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून पडून आहे. यासाठी लागणारी ७२ हेक्टर जमीन आणि त्यांची परवानगी यामुळे हा प्रस्ताव रखडला आहे. वाढत्या लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याच मुख्य स्रोत आहेत.
उरणचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक व नागरी विकास सुरू आहे. त्यामुळे सद्य स्थितीत दररोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही. रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता १० एमसीएम एवढी आहे तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम १.७५ एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त तीन ते चार महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ मोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठे गोदामे यामुळे या परिसरात नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. या विकासामुळे उरण तालुक्यात नागरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकरण, औद्योगिकी करणासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे.
उरण तालुक्यात झपाट्याने नागरिकरण वाढत आहे. मागील वर्षीपासून उरण तालुक्यात रेल्वे लोकल देखील सुरू झाली आहे. न्हावा-शिवडी अटल सेतू यामुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथील नागरी वस्तीत वाढ झाली आहे. उरण मधील दोन धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे.
हेटवणे धरणातून उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, भोम, मोठीजूई, कोप्रोली, खोपटे, विधणे, दिघोडे, वेश्वी, चिलें, जांभूळपाडा, गावठाण तर द्रोणागिरी नोड आणि करंजा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून जेएनपीटी वसाहत आणि जेएनपीए बंदराला पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून २५ ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, वायू विद्युत केंद्र, बीपीसीएल, असे मिळून रोज ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील १० गावांना पाणीपुरवठा केला जातो.
सध्या सिडकोतर्फे आणि म्हाडातर्फे मोठमोठे गृह प्रकल्प उभे करण्यात आले आहेत, तर खासगी बिल्डरांकडून देखील टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरू झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक राहण्यासाठी सुरूवात झाली आहे. सिडको आणि म्हाडाच्या इमारतीतील घरे अगोदरच बुक करण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन पाणवठे तयार करून पाण्याचे स्रोत वाढविण्याची गरज आहे.
रानसई धरणाच्या उंची वाढीचा प्रस्ताव अनेक कारणांनी रखडला आहे. यात वन विभागाच क्षेत्र येत आहे. त्यांच्या परवानग्या शिल्लक आहेत. तसेच बधितांचे पुनर्वसन तसेच उंची वाढल्या नंतर मागणी येईल का आदी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याची माहीती नाव न छापण्याच्या अटीवर देण्यात आली आहे.