उरण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे तसेच चक्रीवादळ व त्सुनामीचा धोका संभवत असून पावसाळ्यात या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी उरण तहसील कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा जाहीर केला आहे. यात तालुक्यातील पुनाडे, चिरनेर व कडाप्पे गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे, तर आराखडय़ानुसार तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तहसील कार्यालयात चोवीस तास अखंडपणे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाशी जनतेने तातडीने संपर्क साधून आपत्तीची माहिती देण्याचे आवाहन तहसील कार्यालयाने दिले आहे. तसेच या आराखडय़ासंबंधी अधिकारी व प्रशासनाच्या मुख्य विभागाकडे संपर्कासाठी दूरध्वनीही देण्यात आलेले आहेत.

उरण तालुक्यात रायगड जिल्हा भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुनाडे, चिरनेर व कडाप्पे या तीन गावांना कमी-जास्त प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गावांत एकूण ६ हजार ६९६ लोकसंख्या असून बाधित होणाऱ्यांची संख्या एक हजार आहे. खाडीकिनारी असलेल्या पाच गावांना चक्रीवादळ व त्सुनामीचा धोका संभवत असून यामुळे २३ हजार लोकसंख्या बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या तालुक्यातील साथीच्या रोगांनी पाच गावे बाधित होण्याची शक्यता असून यामध्ये १० हजार ७२६ नागरिकांना धोका होऊ शकतो.  या अहवालात तहसीलदार, तहसील कार्यालयातील महत्त्वाचे अधिकारी, तालुक्यातील विविध आस्थापनांतील अधिकारी, त्यांची कार्यालये, आपत्तीच्या वेळी जमण्याची ठिकाणे, गावोगावचे पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी यांची माहिती देण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी उरण तहसील कार्यालयात  चोवीस तास नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली आहे. तसेच उरणच्या २७२२२३५२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.