फुप्फुसाचे आजार वाढण्याचा आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
नवी मुंबई : खारघर, तळोजा, पनवेल या भागातील हवेतील प्रदूषणाची पातळी थेट तीनपट वाढल्याचे निरीक्षण एका खासगी पर्यावरण संस्थेने नोंदविले आहे. तर ऐरोली व घणसोली या भागातही हवेतील गुणवत्ता निर्देशांकातही वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीत प्रभात फेरीचे बेत आखणारे जेष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांमध्ये फुप्फु साचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. करोना काळात अशा प्रकारे फुप्फुसाचे आजार वाढणे धोकायदायक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
टीटीसी औद्योगिक वसाहतीतील तळोजा एमआयडीसीत शेकडो रासायनिक कारखाने प्रदूषणाला हातभार लावत असल्याचे हरित लवादानेही जाहीर केले आहे. त्यामुळे तळोजा, खारघर व पनवेल या आजूबाजूच्या लोकवसाहतींना थंडीच्या या काळात प्रदूषणाचा जास्त सामना करावा लागत आहे. सर्वसाधारपणे हवेतील २.५ धुळीकणांचा आकार हा साठ पीएम (पार्टिक्क्युलेट मॅटर पोल्युटंट)पर्यंत असावा असा नियम आहे पण खारघर, तळोजा परिसरात तो १०० पीएमपर्यंत पोहचला आहे. पीएम १० या धुळीकणांचा आकार देखील वाढला आहे. हे हवेतील कण डोळ्यांनी दिसत नसल्याने त्याचा अंदाज येत नाही. हवेसारखे असणाऱ्या या कणांची संख्या महामुंबईत वाढली आहे. हवेतील गुणवत्ता
ढासळली असून ती ऐरोली,घणसोली, खारघर आणि तळोजा या परिसरात जास्त प्रमाण आहे. नवी मुंबईतील हवेतील प्रदूषण हे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरण्यास जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी नागरिकांना श्वास घेण्यास अडचण, डोळे जळजळ आणि दम्याच्या त्रास होऊ शकतो असे डॉक्टरांनी स्पष्ट केले, फुफुसांचे आजार बळावतात. दमा, अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी हे प्रदूषित घटक घातक असल्याचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ.सोमनाथ माल्कंमीर यांनी सांगितले.
१७ तास दूषित हवा
* पांडव कडा, सेंट्रल पार्क आणि विस्तीर्ण मोकळी जागा असलेल्या खारघरमध्ये प्रभात फेरीला जाणे आता आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक झाले आहे.
* या भागातील वातावरण १७ तास प्रदूषित राहात असल्याचा निष्र्कष वातावरण फाऊंडेशन या संस्थेने काढला आहे.
हवेतील या वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढण्याची जास्त शक्यता आहे. डोळ्यानेही न दिसणाऱ्या या धूळ कणांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, हृदयविकाराचा त्रास वाढतो. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना हा त्रास जास्त जाणवतो. करोनाच्या या काळात प्रकृती सांभाळणे सर्वानी आवश्यक आहे.
– डॉ. श्याम मोरे, डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरुळ
नवी मुंबईतील हवा गुणवत्ता केंद्रांवर हवेची गुणवत्ता माहिती सातत्याने नोंदविली जात नाही. येथील हवा प्रदूषित आहे. त्यामुळे हवेत येणारे प्रदूषित घटक कोठून येतो याची माहिती घेत योग्य ती कारवाई केली तर यावर आळा बसेल. या प्रदूषित घटकांचा लहान मुले, ज्येष्ठ तसेच गर्भवती महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
– फराह ठाकूर, मोहीम प्रमुख, वातावरण संस्था