नवी मुंबई : बुधवारी सायंकाळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच वेळी जोरधारांचा पाऊस सुरू झाला. तीन तासांत ६३.६५ मिमी पाऊस झाल्याने सायंकाळनंतर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
कमी वेळात अधिक पावसाची नोंद झाल्याने सखल भागांत मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. बेलापूर कोकणभवन, नेरुळ एमआयडीसी तसेच ऐरोली, दिघा परिसरात पाणी साठण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे घराकडे परतणारा नोकरदार जागोजागी अडकून पडला. तसेच शुक्रवारी होणाऱ्या विसर्जनासाठी तयारी करणाऱ्या सार्वजनिक गणशोत्सव मंडळांची एकच तारांबळ उडाली.
गुरुवारी दुपारी ढग दाटून आल्याने तीन वाजताच अंधार पडल्याचे चित्र होते. त्यानंतर पावसाने सुरुवात केली ती जोरधारेने. पुढील तीन तास संततधार पाऊस झाला. ठाणे-बेलापूर तसेच शीव-पनवेल महामार्गावर रस्ते वाहतूक मंदगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. संपूर्ण नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी विभागात ऐरोली, दिघ्याच्या तुलनेत कमी पाऊस होता. परंतु कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने रस्त्यावरही पावसाचे पाणी साचले. ऐरोली, दिघ्यात सरासरी ८४ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू होती. मात्र मुंबई तसेच ठाण्यात रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने नवी मुंबईत परतणारा नोकरदार जागोजागी अडकून पडला होता. शहरात सर्वदूर पाऊस झाला. गणपतीपाडा परिसरात पाणी साचले होते तर रबाळे तलाव परिसरात एक झाड कोसळले असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या.
झालेला पाऊस मिमी
बेलापूर : ५२.१
नेरुळ : ६८.१
वाशी : ४७.१
कोपरखैरणे : ४५.४
ऐरोली : ८४.५
दिघा : ८४.७
सरासरी पाऊस : ६३.६५
हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. परंतु ठाणे व त्यापुढील मार्गावर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. त्यामुळे नवी मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
-प्रवीण पाटील, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे