उत्पादन कमी; दर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता
साधारणपणे जानेवारी महिन्यात सुरू होणारा हापूस आंब्याचा हंगाम यंदा महिनाभर लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात महिनाभर पडलेली कडाक्याची थंडी आणि जुलैमध्ये पडलेला मुसळधार पाऊस याचा परिणाम आंब्यावर झाला आहे. थंडीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेला मोहर गळून पडल्याने यंदा फळधारणा उशिरा होणार आहे. त्यात गेल्या वर्षी पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढल्याने त्याचाही परिणाम आंबा उत्पादनावर होणार असल्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. परिणामी यंदा हापूस आंब्याची आवक कमी होणार असल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०-२५ वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आंबा गुढीपाडव्यानंतर मुंबईत दाखल होत असे. व्यापारातील स्पर्धेमुळे गेल्या काही वर्षांपासून आंबा जानेवारीपासूनच बाजारात आणण्याचा प्रयत्न बागायतदार आणि व्यापारी करू लागले आहेत. हापूस आंब्याची एखादी पेटी मार्केटिंगसाठी डिसेंबरमध्येच हजेरी लावून जाते, मात्र खऱ्या अर्थाने १५ जानेवारीनंतर तुरळक प्रमाणात हापूस आंब्याची आवक नवी मुंबई व पुण्यातील घाऊक बाजारपेठांत सुरू होते, असा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे.
यंदा या काळात हापूस आंबा विक्रीस येण्याची चिन्हे नाहीत. आंबा फेब्रुवारीच्या मध्यावर मुंबईत येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या कमी उत्पादनामुळे हा हंगाम जेमतेम एक महिना टिकण्याचा अंदाज आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. कोकणात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाडांना मोहर फुटला होता. त्यावर हापूस आंब्याचे गणित मांडणाऱ्या आंबा बागायतदारांना गेला महिनाभर कडाक्याच्या थंडीने कुडकुडी भरवली. मोहर गळून गेला असून केवळ १०-१५ टक्के मोहर शिल्लक आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील मोहराला फळधारणा झाली आहे पण त्याचे बऱ्यापैकी मोठय़ा फळात रूपांतर होण्यास आणखी एक ते दीड महिना लागणार आहे. परिणामी बाजारात हापूस आंबा पाठविण्यास विलंब होणार आहे.
दक्षिणेतील आंब्यांचे आव्हान
कोकणातील हापूस आंब्यावर नैसर्गिक आपत्ती ओढावली असताना केरळ आणि तामिळनाडूतील हापूस आंब्यांनी हळूहळू जोर धरण्यास सुरुवात केली आहे. सध्या १००-२०० डझनात जाणारा हा आंबाही पुढील महिन्यात मोठय़ा प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील हापूस आंब्याने पहिल्यांदाच मुंबईची बाजारपेठ पहिली आहे. त्यामुळे कोकणातील हापूसला दक्षिणेतील हापूस आंब्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
कडाक्याची थंडी आणि परतीचा पाऊस याचा मोठा परिणाम हापूस आंब्यावर झाला आहे. एप्रिलअखेपर्यंत हा हंगाम संपण्याची शक्यता आहे. २०१५मध्ये ही स्थिती निर्माण झाल्याने सरकारने व्याजाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते ते अद्याप पूर्ण झालेले नाही. आंबा बागायतदारांची स्थिती दयनीय झाली आहे.
– राजू पेडणेकर, आंबा बागायतदार, रत्नागिरी</strong>
सर्वसाधारपणे जानेवारीत हापूस आंब्याची आवक सुरू होते व्यापाऱ्यांनी इतर व्यवसाय बाजूला सारून या व्यवसायासाठी बाजारात ठाण मांडले आहे पण कोकणातील हापूस आंबा अद्याप घाऊक बाजारात आलेला नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांबरोबरच व्यापाऱ्यांचाही जीव टांगणीला लागला आहे.
– बाळासाहेब बेंडे, आंबा व्यापारी, एपीएमसी, तुर्भे