भाजीपाल्याच्या ४२४ गाडय़ा दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी संपामुळे गेला आठवडाभर शुकशुकाट असलेला वाशी बाजार गेल्या तीन दिवसांपासून परराज्यांतून आणि काही प्रमाणात महाराष्ट्रातूनही येऊ लागल्या भाज्यांच्या गाडय़ांमुळे गजबजला आहे. मंगळवारी भाज्यांच्या ४२४ गाडय़ा बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.वाशीच्या बाजारात गेल्या तीन दिवसांपासून भाजीपाला, फळे आणि कांद्याची आवक वाढत आहे, संपकाळात वाढलेले दर हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. रमजान सुरू असल्याने फळांना जास्त मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजीपाल्याच्या गाडय़ांची आवक १०० गाडय़ांनी वाढत आहे. कांद्याच्या ८८ , बटाटाच्या ५५, लसणाच्या १२, मसाल्याच्या ७२ आणि धान्याच्या १८४ गाडय़ा बाजारात आल्या. वाशी कृषी उत्पन्न समितीतील आवक सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढली. त्यामुळे बाजारपेठेत समाधानकारक उठाव पाहावयास मिळाला.

कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता

नवी मुंबई वाशी येथील घाऊक बाजारात कांद्याची आवक सोमवारच्या तुलनेत वाढली असून भाव एक रुपयाने कमी झाले आहेत. बाजारात कांद्याला उठाव नसल्याने ही मंदी आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आज बाजारात ९ ते ११ रुपये प्रती किलो असलेला कांदा आणखी खाली कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभावाच्या मागण्या घेऊन राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. फळ आणि भाजी बाजारात आवक सुरळीत झाली असून वाटाणा, गवार सारख्या एक-दोन भाज्या महाग आहेत. कांदा व बटाटा घाऊक बाजारात मंगळवारी ८५ ट्रक कांदा आला. त्यामुळे नाशिक व ओतूरवरून येणाऱ्या कांद्याची आवक बऱ्यापैकी असली तरी मालाला ग्राहकच नाहीत. अनेकांनी कांद्याची साठवण करून ठेवलेली आहे. त्यामुळे सध्या खरेदीदार नाहीत. येत्या काळात आवक वाढण्याची शक्यता आहे पण उठाव नसल्याने भाव घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सांडपाण्यावर पिकवलेल्या भाज्यांची विक्री

नवी मुंबई : शेतकरी संपामुळे किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले असताना, त्या कालावधीत नवी मुंबईच्या आसपासच्या परिसरात सांडपाण्यावर भाजी पिकवणाऱ्यांनी मात्र आपल्या तुंबडय़ा भरून घेतल्या. या भाज्या तुलनेने स्वस्त मिळत असल्यामुळे त्यांची विक्रीही मोठय़ा प्रमाणात झाली. रसायनमिश्रित सांडपाण्यावर या भाज्या पिकवण्यात आल्यामुळे त्यांचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नवी मुंबईत नेरुळ सीवूड्स स्थानकांदरम्यान, जुईनगर ते सानपाडा रेल्वे स्थानकांदरम्यान, कोपरी गावाजवळील रेल्वे वसाहती जवळ वाशी ते ठाणे रेल्वे मार्गालगत असलेल्या कोपरखैरणे ते तुर्भे स्थानकांमध्ये जवळ पास तीन  ते चार एकर जमिनीवर परप्रांतियांनी भाजीचे मळे फुलवले आहेत. रेल्वे रुळांलगतच एमआयडीसीचा नाला आहे. याच नाल्यातून डिझेलवर चालणाऱ्या पंपाच्या सहाय्याने या सांडपाण्याचा उपसा करून ही भाजी पिकवली जाते आणि आसपासच्या भागात विकली जाते. संपकाळात भाज्यांचे भाव चढे असताना या परवडणाऱ्या भाज्यांची विक्री  मोठय़ा प्रमाणात झाली. दररोज एक टनाच्या आसपास येथून भाजी विक्रीसाठी बाजारात पाठविण्यात येते होती, असे सांगण्यात येते. रेल्वेच्या क्षेत्रात भाजी पिकवण्यात येत असूनही, रेल्वे प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात रेल्वेचे जनंसपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra farmers strike 424 vegetable trucks arrive at vashi apmc market
First published on: 07-06-2017 at 04:48 IST