नवी मुंबई : खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात महावितरणमधील ७ कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपामुळे नवी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार, १० ऑक्टोबर) संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महावितरण प्रशासनाशी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे संप मागे घेतला असून, येत्या १५ ऑक्टोबर रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत खासगीकरणाचा मुद्दा, पुनर्रचना प्रक्रिया, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि संघटनांच्या इतर प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे कर्मचारी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले.

संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वीज सेवा अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू केला होता. त्यामुळे संप बेकायदेशीर ठरला होता. तरीही कर्मचारी संघटनांनी आंदोलन कायम ठेवत, चर्चा झाल्याशिवाय मागे न घेण्याचा निर्णय घेतला होता. अखेर चर्चेनंतर समाधानकारक हमी मिळाल्याने संप स्थगित करण्यात आला आहे.

दरम्यान, संपामुळे नवी मुंबईतील सीवूड्स, नेरुळ, बेलापूर, वाशी, एपीएमसी आणि घणसोली परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर काही भागांमध्ये पुरवठा रात्रीपासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मात्र महावितरणकडून अतिरिक्त तंत्रज्ञ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

महावितरण वाशी मंडळ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संध्याकाळपर्यंत नवी मुंबईतील सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल. “संप मागे घेतल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे. काही तांत्रिक अडचणी असून त्या लवकरच सोडवल्या जातील,” असे महावितरणचे कार्यकारी अभियंता रामलिंग गोरखनाथ बेले यांनी सांगितले.

“वीजसेवा पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांक १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ वर संपर्क साधावा.” असे महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे.

संप मागे घेतल्यानंतरही अनेक नागरिकांना दिवसभरात वीजपुरवठा विस्कळीत राहिल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी इन्व्हर्टर आणि जनरेटरचा आधार घ्यावा लागला, तर लहान उद्योगधंद्यांचे आणि एपीएमसीचे कामकाज ठप्प झाले होते.

“महावितरणकडून आमच्या मागण्यांवर चर्चा करण्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला असून, १५ ऑक्टोबरच्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल.” असे संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.