मंगळवारऐवजी शुक्रवारी वीज पुरवठा बंद केल्याने शिवसैनिकांचा मोर्चा
शहरातील साईनगर फीडरवरील साईनगरसह कोळीवाडा येथील हजारो वीज ग्राहकांचा शुक्रवारी वीज महावितरण कंपनीच्या विरोधातील पारा चढला. कोणतीही सूचना न देता मंगळवारऐवजी शुक्रवारी वीज पुरवठा बंद केल्याने वीज ग्राहकांनी शिवसैनिकांना घेऊन पनवेलच्या महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातला. वीज ग्राहकांचा चढलेला पारा पाहून सायंकाळपर्यंत बंद केलेल्या वीज प्रवाह दुपारी पूर्ववत करण्यात आला.
पनवेल शहरातील वीज ग्राहकांना वीज महावितरण कंपनीने गृहीत धरल्याने कधीही वीज घालवा कोणीही विचारण्यास नाही असे शहरातील विजेचे चित्र आहे. वीज यंत्रणा जुनाट असल्याने कधीही झम्पर तुटणे, रोहित्र पेटणे, वीजवाहिनीला आग लागणे, डीपी जळणे अशा घटना नित्याच्या आहेत. या कोणत्याही विजेच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक मंगळवारी वीज यंत्रणेची दुरुस्ती करायची म्हणून महावितरण कंपनीने शटडाऊन घेतला आहे. मात्र या शटडाऊनव्यतिरिक्त रोज दिवसातून तीन वेळ शहरातील वीज गुल होते. कोणताही भोंगा शहरात फिरला नाही तरीही सकाळी वीज गेल्याने वीज ग्राहकांचा संयम तुटला आणि त्यांनी जाब विचारण्यासाठी वीज महावितरण कंपनीचे टपालनाका येथील कार्यालय गाठले. या सर्वाला शिवसैनिकांनी वीज ग्राहकांना साथ दिल्याने अचानक आंदोलनही झाले. वीज कधी घालवणार याची माहिती देत नाही आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयात फोन केल्यास येथील दूरध्वनी बंद असल्याने ग्राहकांनी करावे तरी काय, असा प्रश्न संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला. शिवसैनिकांचा एक गट या वेळी एक मोबाइल फोन दुकानातून विकत घेऊन अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी गेले होते. मात्र येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचा फोन सुरू करू असे उत्तर दिले. मागील अनेक दिवसांपासून कार्यालयातील तक्रारींसाठी उपलब्ध असणारा फोन बंद आहे.