नवी मुंबई – भांडुप परिमंडळातील नेरुळ आणि पनवेल ग्रामीण विभागात मिळून तब्बल ४५ हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या अत्याधुनिक स्मार्ट टीओडी मीटरमुळे वीज चोरीचा प्रकार समोर आला असून संबंधित ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायदांतर्गत गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वीज ग्राहकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे महावितरणाच्यावतीने सांगण्यात आले.
नेरुळ विभागातील जुईनगर सेक्टर २३ येथे संजीवनी घरटकर यांच्या घरात बसवलेला मीटर तपासला असता, तो ५२ टक्के मंद गतीने चालत असल्याचे आढळले. या मीटरच्या सीलमध्ये फेरफार केल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. तपासणीत सर्किटमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या दोन महिन्यांत ४०३ युनिट इतका अनधिकृत वापर करून कंपनीचे २२,४४३ रुपयांचे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी घरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पनवेल ग्रामीण विभागात आणखी दोन वीज चोरी प्रकरणे उघड झाली असून त्यामध्ये अनुक्रमे १८,२०० व ५,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे नेरुळ व पनवेल परिसरात मिळून एकूण ४५,००० रुपयांहून अधिक वीजचोरी झाल्याचा प्रकार निदर्शनात आला.
टीओडी मीटरमुळे वीज चोरी उघड
महावितरणकडून अत्याधुनिक टीओडी मीटर सर्वत्र बसविले जात आहेत. टीओडी मीटर हे थेट महावितरणच्या नेटवर्क सर्व्हरला जोडलेले असल्याने या मीटरमध्ये छेडछाड केल्यास, मीटर नादुरुस्त झाल्यास महावितरणकडे याबाबत तात्काळ माहिती (रिअल टाईम डाटा) उपलब्ध होतो. अशा ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ आणि १३८ नुसार वीज चोरीची कारवाई करण्यात येते.
महावितरणकडून आवाहन
वीज मीटरमध्ये छेडछाड करून, वीज वाहिन्यांवर आकडे टाकून अथवा अन्य मार्गाद्वारे वीजचोरी करणे हा एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्यात सहापट आर्थिक दंड आणि ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. तरी, ग्राहकांनी कुठल्याही वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन महावितरणच्या भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी वीज ग्राहकांना केले आहे.