हॉटेलांत चोरी करणाऱ्यास सहा महिन्याचा तुरुंगवास

नवी मुंबई</strong> : पोलिसांनी आरोपीला अटक केले तरी शिक्षा होण्यास प्रचंड विलंब होत असतो. मात्र देशभरात १८७ पंचतारांकित हॉटेलांमध्ये चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक केल्यानंतर फक्त चार दिवसांत नवी मुंबई न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्याला सहा महिने तुरुंगवास व दोन हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वाशी पोलिसांच्या तत्परतेमुळे एवढय़ा जलदगतीने निकाल लागल्याची ही पहिलीच घटना आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपीला अटक करीत पुरावे गोळा करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे आणि न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांचे त्या प्रकरणातील काम संपते. मात्र यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने न्याय दानाची प्रक्रिया ही लांबते. मात्र चार दिवसांत एखाद्या प्रकरणात आरोपीला अटक करीत न्यायालयाने शिक्षा सुनावल्याच्या घटना खूप कमी पाहावयाला मिळतात. नवी मुंबईत तर पहिल्यांदाच हे घडले आहे. यापूर्वी कोपरी भागात राहणाऱ्या बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी साडेतीन महिन्यांत आरोपीला शिक्षा सुनावल्याची नोंद आहे.

व्हिन्सेंट जॉन या ६३ वर्षीय आरोपीस वाशी पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी अटक केली होती. आरोपी येथील तुंगा हॉटलमध्ये चोरी करीत फरार झाला होता. वाशी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने आतापर्यंत देशभरात १८७ पंचतारांकित हॉटेलांमध्ये चोरी केल्याचे उघड झाले होते. या बाबतीत गुन्हा नोंद झाल्यानंतर वाशी पोलिसांनी त्याला १५ डिसेंबर रोजी अटक करीत १८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करीत त्याच्यावर दोषरोपपत्रही दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याच दिवशी निकाल दिला. त्याला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे यांनी काम पाहिले, तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. मिलिंद दातरंगे यांनी काम पाहिले.

एवढय़ा झटपट निकाल फार क्वचित प्रकरणांत लागतात. या प्रकरणातही असेच घडले आहे. न्यायदानासाठी आवश्यक सर्वच बाबी समोर आल्या की न्यायदान प्रक्रिया पार पडण्यास विलंब होत नाही.

मिलिंद दातरंगे, सरकारी वकील