नवी मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघन वाजत असून निवडणूक संबंधित विविध प्रक्रियांनी आता वेग घेतला आहे. नवी मुंबईत वाशीतील विष्णुदास भावे नाट्य ग्रहात मनपा निवडणूक संबंधित आरक्षण सोडत पार पडली. यासाठी शहरातील शेकडो उत्सुक माजी नागसेवक सह नव्याने निवडणुकीला उभे राहणाऱ्या इच्छुकांची तोबा गर्दी झाली होती.

ज्या शहरात नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत हि मंडळी येथे आली मात्र पार्किंगला जागा नसल्याने थेट रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या दिसून येत होत्या. त्यामुळे बस थांब्या वर बस न थांबता थेट रस्त्यावर थांबवून प्रवासी चढ उतार करीत होते. परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली तरी वाहतूक पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका धक्कादायक होती.

नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक संबंधित विभागवार आरक्षण सोडत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडली. या ठिकाणी प्रभागात आरक्षक बाबत नशीब साथ देते कि पुन्हा पुढील निवडणुकी पर्यंत थांबावे लागते. तसेच नक्की कोणाचा पत्ता कट होतो कोणाला लॉटरी लागते हे पाहण्यासाठी इच्छुकांची तोबा गर्दी झाली होती. वाशीतील या नाट्यगृहाची पार्किंग फुल्ल झाल्याने नाट्यगृहा बाहेर रस्त्यावर दुहेरी तिहेरी गाड्या पार्क केल्या गेल्या.

यातील कोण भावी नगरसेवक होईल हे काळ ठरवणार असले तरी आपण एखाद्याच्या गादीवर कारवाई करावी आणि नेमका तोच निवडून यावा… आपलीच गोची होईल या भीतीने वाहतूक पोलिसांनीही कारवाई करण्याचे टाळले.

या नाट्यगृह बाहेरील रस्ता शहरातील सर्वात जास्त रहदारीचा कोपरखैरणे वाशी हा आहे. नाट्यगृहा बाहेर वाशी स्टेशन, सीबीडी नेरुळ पनवेल तसेच मुंबईतील विविध उपनगरे कडे जाणाऱ्या बस या थांब्यावर थांबत असल्याने प्रवाशांची गर्दी असते. अशात या इच्छुक नगरसेवकांनी थेट बस थांब्यावर गाड्या थांबवल्याने येणाऱ्या बस अर्ध्या रस्त्यावर थांबत होत्या. त्यात जवळच असणाऱ्या सिग्नल वरून सुटणाऱ्या गाड्या बस थांबल्याने त्याही थांबत असल्याने सिग्नल सुटताच वाहतूक कोंडी होत होती. हे सर्व सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड वाजे पर्यंत जेव्हा जेव्हा सिग्नल सुटेल तेव्हा तेव्हा वाहतूक कोंडी होत होती.

आरक्षण सोडत होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित असल्याने पोलीस आणि वाहतूक पोलीस हि तैनात करण्यात आले होते. मात्र एकही पोलिसाने कारवाई दूरच मात्र कोणाला हटकले हि नाही. अशी खंत अरविंद झा या जेष्ठ नागरिकाने व्यक्त केली. तर वाहतूक कोंडी सारखी गंभीर समस्येत भर घालणाऱ्यांच्या हातात शहर द्यायचे का ?अशी प्रतिक्रिया निवृत्त प्राध्यापिका अरुणा लातूरकर यांनी दिली.

या प्रकरणी वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांना विचारणा केली असता माहिती घेत योग्य ती कारवाई करून पोलिसांनाही सूचना दिल्या जातील असे सांगण्यात आले.

चौकट: २०१५ नंतर मनपा निवडणूक झाल्या नाहीत तर २०२० पासून २०२५ पर्यंत करोना , आणि ओबीसी आरक्षण निर्णयामुळे निवडणुका लांबल्या. त्यामुळे सद्य स्थितीत प्रशासक यांच्या हातात शहर असून नगरसेवक कार्यकाळ संपल्याने कोणीही नाही असे असले तरीही बिनदिक्कत गादीवर मनपाचा लोगो आणि नगरसेवक किंवा नगरसेविका असे स्टिकर लागलेल्या अनेक गाड्या या ठिकाणी आढळून आल्या . मात्र त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. इच्छुक नगरसेवक आणि नगरसेविकांनी रस्त्यावर पदपथावर गाड्या पार्क करण्याऐवजी हाकेच्या अंतरावर असणारी सेक्टर १६ येथील गटर वर हेवी स्लॅब टाकून करण्यात आलेल्या पार्किंग जागेवर गाड्या पार्क करण्याची तसदी घेतली नाही.