पनवेल : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा नातू मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवीत असल्याने सर्वाचे लक्ष वेधले होते. माध्यमांचा कल खोटा ठरेल व आपला पार्थ निवडून येईल, अशी अपेक्षा आघाडीच्या प्रतिनिधींना गुरुवारी दुपारीपर्यंत हाती. मात्र सायंकाळी दुपापर्यंत दोन लाख मतांची आघाडी श्रीरंग अप्पा बारणे यांनी घेतल्याने आघाडीच्या अनेक पुढाऱ्यांचे मोबाइल फोन स्विच ऑफ (बंद) झाले. भाजप शिवसेना युतीच्या पारडय़ात या उलट जल्लोषाचे वातावरण होते. सायंकाळी साडेसातपर्यंत बरणे यांना ७ लाख १८ हजार ९५० तर पार्थ यांना ५ लाख ३३ हजार ३५ मते पडली होती. बरणे यांना २ लाख १५ हजार ६३५ मतांची आघाडी होती.

गुरुवारी सकाळपासूनच मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल परिसराचे वातावरण निकालाकडे लागले होते. अनेकांनी स्वत:च्या घरात व कार्यालयातील टीव्हीसमोर मित्रांसोबत बसून निकालाचा तपशील घेतला. मतमोजणीपूर्वी विविध माध्यमांनी जाहीर केलेल्या मतांच्या कलामुळे आघाडी सामसूम होती. तर भाजप व शिवसेनेनी बुधवारी सायंकाळपासून प्रत्येक वसाहतीमध्ये विजयोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचे आदेश दिले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावे एक लघुसंदेश विविध नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर अगोदरच खणाणला होता. यामुळे विजयाचा जल्लोष गुरुवारी भाजपच्या कार्यालयात होणार याची बाजेवाल्यांनाही सुपारी बुधवारीच मिळाली होती.

मावळ मतदारसंघाचा निकाल पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात जाहीर होणार असल्याने अनेक समाज माध्यमांचे निकालाच्या प्रत्येक फेऱ्यांचे लघुसंदेश पनवेलपर्यंत पोहचत होते. सकाळी अकरा वाजल्यापासून या लघुसंदेशांना सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून सुमारे ५० हजारांची आघाडी बारणे यांना मिळत असल्याने त्या मताधिक्यात वाढ होत गेली. सायंकाळी साडेसातपर्यंत १२ लाख ५७ हजार मतांपैकी बारणे यांच्या वाटय़ाला ७ लाख १८ हजार ९५० मते मिळाली होती.

अखेर मावळ मतदारसंघातील मतदारांनी पार्थ पवारांना घराचा रस्ता दाखवत खासदारकीची माळ बारणे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा घालणे पसंद केली.

ठाकुरांचे निष्ठेने पनवेलमधून बारणेंना आघाडी

पनवेल शहर, खारघर, कामोठे, कळंबोली शहरी मतदारांनी देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देण्याचे पक्के ठरविल्याने यावेळी मोठय़ा प्रमाणात मोदींच्या नावाखाली बारणेंना भरघोस मते मिळाली. बारणे हे पहिल्या दिवसापासून कोण पार्थ पवार, त्यांचे या मतदारसंघात काय योगदान त्यामुळे आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी पनवेलमधील कार्यालयात मी स्वत: नागरिकांना उपलब्ध होतो, संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारा मी सामान्य कार्यकर्ता अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्यात बारणे यशस्वी झाले.

शरद पवार यांच्यापासून अजित पवार यांनी पनवेलच्या अनेक गल्ल्या फिरून प्रचार केला. तरीही त्याचा लाभ पार्थला होऊ शकला नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिवावर पनवेल, कर्जत व उरणमध्ये ही निवडणूक राष्ट्रवादी कँाग्रेस पक्षाने लढविली होती. त्याचा काही लाभ झाला नाही. उलट पनवेलमधून सुमारे ५५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य बारणे यांच्या वाटय़ाला आले.

या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर ऐनवेळी विश्वासघात करतील असेही चित्र रंगविण्यात आले. मात्र ठाकूर पितापुत्रांनी मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. ठाकूर कुटुंबीयांच्या प्रामाणिकपणांमुळे हे ५५ हजारांचे मताधिक्य बारणे यांच्या वाटय़ाला पनवेलमधून आले.

गुरुवारच्या पनवेलमधील ५५ हजार मताधिक्याच्या निकालामुळे  शिवसेनेला लोकसभा निवडणुकी वेळी केलेल्या मदतीची परतफेढ पनवेल विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकूरांसाठी विनाशर्त करेल, याच अपेक्षेने हा सर्व मतांचा खेळ रचला गेल्याचे समजते.

दुपारी तीन वाजेपर्यंत खांदेश्वर येथे पनवेल पालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला तर कळंबोली येथे रवींद्र पाटील व भाजप कार्यालय प्रमुख खंडेलवाल यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला.