नवी मुंबई : ठाणे -बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने असलेल्या रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी २७ वर्ष जुनी ३.६ किलोमीटर वाहिनी नव्याने उभारण्याच्या हालचाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठीचा प्रस्ताव एमआयडीसीने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवला असून यासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून महत्त्वाचे सल्लेही देण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक पार पडली. यामुळे सद्यस्थितीतील वाहिनीलगतच नवीन वाहिनी उभारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे जुन्या वाहिनीतून होणाऱ्या सांडपाण्याच्या गळतीतून ठाणे – वाशी खाडीला आणि आसपासच्या परिसराला मुक्तता मिळण्याची सकारात्मक चिन्ह दिसून येत आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून ठाणे – बेलापूर औद्योगिक क्षेत्र ओळखले जायचे. सुरुवातीच्या काळात अनेक अभियांत्रिकी कंपन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या. यानंतर येथील ठाणे आणि वाशी खाडीचा भौगोलिक भाग पाहता परदेशातून आणि देशभरातून अनेक रासायनिक कंपन्यांनी या ठिकाणी आपला जम बसवला. मात्र यानंतर खाडीत सांडपाणी थेट सोडले जाऊ लागल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ लागले. यानंतर येथील सर्व लघु – मोठ्या उद्योजकांनी एकत्रित येऊन येथील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी यासाठी पुढाकार घेऊन आणि पाठपुरावा करून नवी मुंबईतील पावने येथे सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. यानंतर येथून रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ठाणे खाडीत सोडण्यात येऊ लागले. याच केंद्रातून सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी जुनी झाली असून नव्याने टाकण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा…Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले

पॉइंटर्स

नवी मुंबईतील पावने येथे १९९७ मध्ये सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. यावेळी त्याची क्षमता १२ दलल (दशलक्ष लिटर) इतकी होती.

येथील रासायनिक कंपन्यांची संख्या वाढू लागली आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होऊ लागल्याने २००६ साली या केंद्राची क्षमता अतिरिक्त १५ दलल इतकी करण्यात आली.

सद्दस्थितीत या केंद्राची क्षमता २७ दलल इतकी आहे. येथून सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तब्बल २७ वर्ष जुनी असल्याने ती पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. तसेच काही ठिकाणी ही वाहिनी तुटलेली असल्याने येथून होत असलेली सांडपाण्याची गळती धोकादायक देखील झाली आहे.

हेही वाचा…एका नागरिकाची नजर पडली अन् मांज्यात अडकले कबुतराचे वाचले प्राण

खारफुटीची अन्यत्र लागवड बंधनकारक

प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सद्यस्थितीत ठाणे खाडीत सोडण्यात येते. यासाठी प्रक्रिया केंद्रातून ३.६ किलोमीटरची वाहिनी हे सांडपाणी वाहून आणते. मात्र तब्बल २७ वर्ष जुनी असलेल्या या वाहिनीची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र आता या वाहिनीची दुरुस्ती करण्याऐवजी ९०० मिमी व्यास असलेली नवीन वाहिनी टाकणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून सुचविण्यात आले आहे. सद्यस्थितीतील वाहिनी लगतच नवीन वाहिनी उभारण्याचे एमआयडीसीचे नियोजन आहे. तसेच या वाहिनीचा काही भाग हा खारफुटीमध्ये देखील येतो. त्यामुळे नवीन वाहिनीचे काम करताना थोड्या प्रमाणात नष्ट होणारी खारफुटीची दुसरीकडे सक्तीने लागवड करणे बंधनकारक असल्याचे ही राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिनीचे नियोजन आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे कोणतेही प्रदूषण होऊ नये यासाठी एमआयडीसी कायम सतर्क असते. तसेच सद्यस्थितीत असलेली ३.६ किमीच्या वाहिनीची देखभाल योग्य पद्धतीने सुरु आहे. संजीव सावळे, उप अभियंता, एमआयडीसी, महापे