दिल्लीचं हवापाणी फारच बिघडले आहे. मुंबईसुद्धा अशी हवापालट झाली की चर्चेत येतेच. शहरांची अशी हवा बदलाची म्हणजे प्रदूषणाची समस्या कायमच डोके वर काढीत असते. अशा परिस्थितीत प्रदूषणाचा विळखा स्वत:भोवती बसू नये यासाठी शहरात अनेक गृहसंकुलातील रहिवाशी प्रयत्नशील असतात. नवी मुंबईच्या निर्मितीनंतर सानपाडा आणि जुईनगरसारख्या रासायनिक कारखान्यांच्या विळख्यात असलेल्या संकुलांनी आर्थिक प्रगतीबरोबच निसर्गाशीही मैत्री कायम ठेवली आहे. हवापाण्याची श्रीमंती वाढवली आहे.
सानपाडा येथे ‘मिलेनियम टॉवर’ उभारला गेला तेव्हा विकासकाने आणि प्रवर्तकांनी असा दावा केला होता की या इमारतीतील प्रत्येक घरादारात हवा खेळती राहील. तो त्यांनी खराही करून दाखवला. इमारत उभी राहिली तेव्हा प्रत्येकाला निसर्गातील श्रीमंती अनुभवता येईल, अशीच रचना केली. नवी मुंबईतील पहिला वैशिष्टय़पूर्ण गृहप्रकल्प म्हणून ‘मिलेनियम टॉवर’चे नाव आजही घेतले जाते. या संकुलाची रचनाच निसर्गरम्य करण्यात आली आहे. सर्वत्र हिरवळ हा त्यातील नितांतसुंदर भाग आहे.
उच्चभ्रू गृहनिर्माण संस्था म्हणून ‘मिलेनियम’कडे पाहिले जाते. सानपाडा रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही गृहनिर्माण संस्था आहे. आजूबाजूला गजबजलेला परिसर असूनही संकुलाच्या आत प्रवेश करताच निसर्गाचा सहवास लाभतो. कामावरून, रस्त्यांवरील धावपळीतून थकूनभागून आलेले, मरगळलेले मन ताजेतवाने होऊन जाते.
मिलेनियमची निर्मिती चार टप्प्यात करण्यात आली आहे. ‘ए’ विंगमध्ये तीन गृहनिर्माण संस्था आहेत. यात उच्चवर्गीय तर ‘बी’ विंगमध्ये मध्यम आणि ‘सी’ आणि ‘डी’ विंगमध्ये रो हाऊस आहेत. संकुलात एकूण १२०० सदनिका आहेत. २००३ साली मिलेनियमचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
निसर्गाचे रूप नेहमीच बदलत असते. ‘मिलेनियम’मधील रहिवाशांना म्हणूनच जगण्यातला शिळेपणा मान्य नाही. संस्थेतील प्रत्येक रहिवासी त्यासाठी हा ताजेपणा घेऊन जगतो आणि जगात जगण्याच्या लढाईत सामील होतो.
संकुलात सजावटीसाठीच्या वनस्पती आहेत. याशिवाय औषधी गुण असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. यात पाम, तुळस, कोरफड, कडुनिंब, ग्लुमेराटा, केळ, जास्वंद, दुरांता, रातराणी, लिसना, मोगरा, गुलाब आणि वड लावण्यात आला आहे. हिरवाईने संकुल अक्षरश: फुलले आहे. संकुलात धार्मिक सण साजरे करण्याची प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात उत्साहाला उधाण आलेले असते. चार संस्थांसाठी एक क्लब हाऊस आहे. क्लब सर्व सोयींनी युक्त आहे. मुलांसाठी टेबल टेनिस, लॉन टेनिस, व्यायामशाळा, जलतरण तलाव याशिवाय योग, नृत्य आणि चित्रकला आदी कलांचे प्रशिक्षण देण्याची सोय आहे.
हवामान बदलाच्या झळा सोसाव्या लागत असताना निसर्गाचे महत्त्व येथील नागरिकांनी जाणले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावण्यात येथील रहिवासी आघाडीवर असतात.
पावलोपावली सूचना फलक
संकुलाच्या प्रवेशद्वारापासून ते इमारतीच्या शेवटापर्यंत पावलोपावली विविध संदेश देणारे फलक येथे आहेत. कोणत्या वाहनांसाठी आणि कोणासाठी कोणत्या जागेवरच वाहने उभी केली पाहिजेत, याच्या सूचना त्याद्वारे देण्यात आल्या आहेत. अगदी चार चाकी वाहनापासून लहान मुलांची सायकल कुठे पार्क करावी याचे व्यवस्थापन करून फलक लावले आहेत.
भविष्यात कचरा भूमी
पालिकेच्या ओला आणि सुका कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर प्रयास करीत आहेत, तसेच प्रयत्न संस्थेच्या आत करणार आहोत. भविष्यात संस्थेच्या आत कचराभूमी तयार करून ओला आणि सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून खारीचा वाटा उचलण्याच्या प्रयत्नात आहोत, असे मिलेनियम सह्याद्री सोसायटीचे अध्यक्ष आनंद साळस्कर यांनी सांगितले आहे.