नवी मुंबई – माझी आई राजकारणात नाही. समाजकारणात आहे. भाजप आज राजकारण करताना कोणत्या थराला जात आहे. आईला यातलं काहीही कळत नाही. माझ्या आईबद्दल विरोधक किंवा आमच्या सोबतच्या लोकांना जरी विचारलं तरी, अतिशय साध्या सरळ स्वभावाच्या त्या आहेत असे सांगतील. आई राजकारण नाही फक्त समाजकारण करते. तिच्या बाजूला कोणी विरोधक येऊन उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही. मात्र निलेश घायवळ समवेतचा माझ्या आईचा फोटो वापरून भाजप असे गलिच्छ राजकारण करत असेल तर त्याचा अर्थ असा निघतो कि, भाजपा मला समोर जायला घाबरत आहे. अशी टीका रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केली आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रम प्रसंगी ते उपस्थित होते.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण चांगलेच तापले असून यात सर्वच नेत्यांनी उडी घेतली आहे. अशातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्या आईचा एका कार्यक्रमातील निलेश घायवळ समवेतचा फोटो समाजमाध्यमांवर टाकून रोहित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते. यावर प्रत्तुत्तर देतांना रोहित पवारांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. आईला कशाला मध्ये आणता? तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची? मी राजकारणात आहे. तुम्हाला काय काढायचं ते काढा, आम्हाला जे काय काढायचं ते काढू, असेही रोहित पवार म्हणाले.

निलेश घायवळला योगेश कदम यांनी बंदुकीचे लायसन्स कुणाच्या सांगण्यावरून दिले हे शिवसेना नेते रामदास कदम यांनीच स्पष्ट केले आहे. मी आधीच बोललो होतो सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून लायसन्स दिले आहे. त्याला रामदास कदम यांनी दुजोरा दिला आहे. मात्र यावरून भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय आहे. असा प्रश्नही रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

गोव्यातील विमानतळाला स्व.मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले होते. हा निर्णय स्वागतार्ह होता. मात्र याच पद्धतीने भूमिपुत्रांच्या विकासासाठी काम करणारे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास काय हरकत आहे. मात्र भाजपा तसे करण्यास तयार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र सद्य परिस्थितीत भाजप आणि संघाचे काही चांगले सुरू आहेत असे चित्र दिसत नाही. यामुळे संघाला खुश करण्यासाठी संघाच्या एखाद्या बड्या नेत्याचे नाव विमानतळाला देण्याच्या तयारीत भाजपा असू शकते. अथवा पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देऊ अशी केवळ घोषणा करण्यात येईल आणि निवडणुका लढवण्यात येतील. मात्र प्रत्यक्षात निवडणुका पार पडल्या नंतर ते नाव बदलून दुसरे नाव दिले जाईल, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.