रोहिदासवाडय़ातील तिघे जण आठ दिवसांपासून बेपत्ता

पनवेल शहरामध्ये दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे देण्याचा आणि दिलेल्या पैशांचे व्याज वसूल करण्याचा धंदा तेजीत सुरू असल्याने एका कुटुंबाला आपले घरदार सोडण्याची वेळ आली आहे. शहरातील रोहिदास वाडा येथील त्रिगुण दर्शन या इमारतीमध्ये संयुक्त परिवारात राहणाऱ्या अभय कल्याणकर त्यांची पत्नी जयश्री व मुलगा निनाद हे सावकारांच्या रोजच्या तगाद्याला वैगातून ९ ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात कल्याणकर कुटुंबीय बेपत्ता झाल्याची आणि संबंधित सावकार हेमंत करवा याच्यावर कारवाई करण्याची मागणी कल्याणकर कुटुंबीयांनी केली आहे.

अभय याचे मोबाइलच्या सीमकार्डचे दुकान सानपाडा येथे आहे. त्यांनी करवा यांच्याकडून काही रक्कम घेतल्याचे कल्याणकर कुटुबीयांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. ९ ऑगस्टला दुपारी तीन वाजता बँकेत जातो, असे सांगून अभय घराबाहेर पडला त्यानंतर तासाभराने अभयची पत्नी जयश्री या मुलगा निनाद याला बागेत घेऊन जाते, असे सांगून घराबाहेर गेली हे तिघेही घरी परतलेच नसल्याने अभयच्या ५० वर्षीय आई पुष्पा यांनी पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची नोंद केली. या घटनेनंतर कल्याणकर कुटुंबीय अभय व जयश्री यांचा शोध घेत असताना १२ तारखेपासून करवा यांनी अभयला दिलेले कर्ज व व्याजाच्या वसुली करण्यासाठी काही मंडळी कल्याणकर यांच्या घरी आल्याननंतर अभयच्या घर सोडून जाण्यामागचे कारण उजेडात आल्याचे पुष्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. पनवेलमध्ये व्याजाने पैसे देण्याचे सावकारी व्यवहार होत असल्याने अभयप्रमाणे अनेकांना व्याजाचे चटके खावे लागले आहेत. सावकार २ टक्के व्याजाने पैसे देण्याचा सरकारी परवाना काढतात आणि प्रत्यक्षात कर्ज देताना कर्जदाराकडून मुद्दलावर १० टक्क्यांनी व्याज मिळेल या पद्धतीने हमी कागदपत्रांवर कर्जदाराच्या स्वाक्षऱ्या करून घेतात. त्यामुळे कर्जदारांनी घरदार सोडावे लागते. या घटनेची तक्रार पुष्पा यांनी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे.

रोहिदास वाडा येथे राहणारे कल्याणकर कुटुंबीयांमधील अभय, जयश्री व निनाद हे तीनही व्यक्ती बेपत्ता झाल्यापासून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. अभय स्वत:चा मोबाइल फोन घरी सोडून गेला असून त्याने जाण्याअगोदर अनेकांना आपण निघून जाणार असे सांगितले होते. या प्रकरणात कल्याणकर कुटुंबीयांनी केलेल्या तक्रार अर्जावरून अभयने ज्यांच्याकडून पैसे घेतले अशा व्यक्तींची चौकशी पोलिसांनी केली आहे. या व्यक्तीने आपल्यासारखेच इतरांकडूनही पैसे घेतले होते असे सांगितले आहे. पोलीस या घटनेतील बेपत्तांचा शोध लवकरच घेतील, तसेच या प्रकरणात बेकायदा सावकारी पद्धतीने व्याज वसुलीचा व्यवसाय झाला असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवरही नक्कीच कायदेशीर कारवाई होईल. विशेष म्हणजे मागील महिन्याभरापासून स्थानिक टीव्हीचॅनेलवर, तसेच विविध जाहीर कार्यक्रमांमध्ये पनवेलमध्ये सावकार हे बेकायदा व्याज वसुली करत असल्यास किंवा व्याजासाठी त्रास देत असल्यास त्याबाबतची माहिती अथवा तक्रार स्वत: माझ्या मोबाइलवरही ९८७०१७५०३३ करू शकता.

– सुनील बाजारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे</p>