उरण : मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक निधी वेळेत मिळत नसल्याने काम रखडले आहे. या कामाचा खर्च ८६ लाखांवरून आता एक कोटी ८२ लाखांपर्यंत पोहोचलेला आहे. तर काम रखडल्याने मोरा सागरी पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

उरण तालुक्यासाठी तीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला सागरी मार्गावरून अधिक धोक्याची शक्यता गृहीत धरून स्वतंत्रपणे कारभार पाहता यावा यासाठी मोरा सागरी पोलीस ठाणे उभारण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्याची जागा अत्यंत अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नवीन इमारत उभारण्यासाठी वन, बंदर व महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून जागेचा तिढा सोडवलेला नाही. अखेर मोरा येथील जुन्या जागेतच पोलीस ठाण्याचा गाडा हाकला जात आहे.

चार वर्षे काम ठप्प

चार वर्षांपूर्वी मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाने आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून दिली. या बांधकामासाठी ८६ लाखांच्या निधीच्या तरतुदीनंतर कामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र चार वर्षे काम रखडल्याने सुमारे २४८ चौमी क्षेत्रफळावरील एकमजली इमारतीच्या कामासाठी ८६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे इमारतीचे काम मागील चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.

मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी मंजूर झालेला निधीच उपलब्ध झाला नसल्याने काम रखडले आहे. नवीन निधीची तरतूद झाल्यास काम मार्गी लागेल.- नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.