पनवेल – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या गणेशभक्तांना खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या कामांमुळे त्रास होऊ नये म्हणून सात महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला होता. मात्र पाहणीनंतर पावसाळा आला आणि पावसाळ्यात पुन्हा या महामार्गाचे काम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढिम्म झाले. अजूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी पथदिवे नाहीत. तसेच कॉंक्रीटचा रस्ता संपल्यानंतर नाल्यापर्यंतचा भागावर माती असल्याने पावसाळ्यात याच मातीवर अनेक वाहनांची चाके रुतली आहेत.
सरकारी प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी पुन्हा मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून पनवेलमधील पळस्पे ते रत्नागिरी (हातखांबा) या पल्यावरील महामार्गाची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हेच मंत्री याच महामार्गाची पाहणी दौरा करून त्यांनी जानेवारी २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे जाहीर केले. मात्र गेल्या सात महिन्यातील कामाची प्रगती ढिम्म असल्याने अजून किती मुहूर्त मंत्र्यांकडून या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी सांगीतले जातील, असा संतापजनक प्रश्न कोकणवासीयांकडून विचारला जात आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नूकतीच अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट पुण्यात दिड तासात पोहचण्यासाठी नव्या रस्त्याची आखणी करत असल्याची घोषणा केली. मात्र गेल्या १२ वर्षात मुंबई गोवा महामार्गाचे काम केंद्र व राज्य सरकार पूर्ण करु शकले नाही. कोकणवासियांनी याविषयी अनेक आंदोलने केली. कोकणाचे प्रवेशव्दार असणा-या पनवेलमधील जेएनपीटी महामार्गावरील पळस्पे उड्डाणपुलावरील खड्डे तसेच पळस्पे येथील पुलाखालील खड्डे यांची जाणिव मंत्र्यांना होऊ नये असा मंत्र्यांच्या दौ-याची आखणी केली जाते.
तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव, कोलाड, रोहा या तालुक्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा या पल्यावर अक्षरशा रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि उंचसखल खड्यांमुळे मोटारीतील प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत. पाहणी करण्यासाठी मंत्री येणार असे समजल्यास महामार्गावरील खड्यांची तात्पुरती डागडुजी करून त्यावर मुलामा दिला जातो. मात्र शेकडोंचे अपघाती जिव घेणारा हा महामार्ग कधी तयार होणार याविषय़ी राज्य व केंद्रातील मंत्री मूग गिळून गप्प आहेत.
सध्या राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य उत्सवाला जाणारे अजून किती बळी या महामार्गावर जातात याविषय़ी चिंता व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, राज्याचे तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अनेक व्यासपिठावरून या महामार्गाचे काम पुर्ण करण्याचे नवीन मुहूर्त जाहीर केले आहेत. या मुहूर्ताच्या तारखांमुळे मंत्री खोटारडे अशीच भावना जनसामान्यांची होत चालली आहे.
विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी फेब्रुवारी महिन्यात पळस्पे ते रत्नागिरी दौरा केल्यानंतर त्यांनी सुद्धा दौ-यानंतर जानेवारी २०२६ हा नवा मुहूर्त जाहीर करून ११ महिन्यांचा मुदतवाढ कंत्राटदारांना दिली. मात्र मंत्री भोसले यांच्या पाहणीला आता सात महिने उलटले असून कामाची प्रगतीची पाहणी मंत्री भोसले करणार आहे. पाहणीवेळी नेमका काय त्रास आहे याची माहिती घेण्यासाठी स्थानिक वाहतूक पोलीस कर्मचारी, त्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकांसोबत, प्रवाशांसोबत चर्चा केल्यास नेमके काय दुखणे आहे ते मंत्री भोसले यांना कळू शकेल. यामुळे पाहणी मंत्र्यांसमोर सरकारी प्रशासनातील अधिकारी व कंत्राटदारांचा बनाव उजेडात येईल. विशेष म्हणजे कोकणाची वाट दाखविणा-या या महामार्गाला पथदिव्यांची सोय केलेली नाही.
अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने रात्रीच्यावेळी दिशादर्शका अभावी येथे अपघात घडले आहेत. त्यामुळे मंत्री शिवेंद्रराजे यांनी सकाळी दौरा करण्यापेक्षा खासगी मोटारीने सामान्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी रात्रीचा प्रवास करण्याची सूचना प्रवाशांकडून होत आहे. पथदिवे नसणारा, नाल्यांची आणि मोटार थांबविण्यासाठी रस्त्याकडेला मजबूत रस्ता नसल्याने हा राज्यातील धोकादायक महामार्ग बनला आहे. मंत्र्यांच्या दौ-यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रस्ता बांधणारे कंत्राटदार, नेते, सरकारी अधिका-यांची रिघ असते. गर्दीत मंत्री रस्त्याची पाहणी करण्यापेक्षा पुष्पगुच्छ च्या गराड्यात पडलेले चित्र यापूर्वी दिसले. २१ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाला गणेशभक्ताला सूखरूप आणि विना वाहनकोंडीचे गावी जाण्यासाठी मंत्री काय सूचना देतात याकडे कोकणवासियांचे लक्ष्य लागले आहे.