नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये झालेल्या विलंबावरून त्यांनी यापूर्वीच्या सरकारवर हल्ला चढवला. “काही काळासाठी आलेल्या सरकारने विमानतळाचे काम थांबवले, त्यामुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले. मुंबईकरांना तीन-चार वर्षे या सुविधेपासून वंचित राहावे लागले. हा विलंब पापापेक्षा कमी नाही,” अशी टीका पंतप्रधानांनी केली. त्यावर आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करताना, “२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस सरकारने कमकुवतपणा दाखवला. भारतीय सैन्य पाकिस्तानवर कारवाईस सज्ज होते, मात्र काँग्रेसच्या एका नेत्याच्या आईने विदेशी दबावाखाली येऊन सैन्याला थांबवले,” असा आरोप त्यांनी केला. “देशाला सांगावे, तो दबाव कोणाचा होता?” असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या धोरणांमुळे देशाची सुरक्षा कमकुवत झाली, तर आजचा भारत दहशतवाद्यांना घरात घुसून मारतो,” असे मोदींनी म्हटले.

मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस प्रवक्ता सैयद नासिर हुसैन यांनी मोदींवर टीका करत, “पंतप्रधानांनी सत्य दडपून दिशाभूल केली आहे. नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो, ट्रांस हार्बर लिंक या सर्व प्रकल्पांची पायाभरणी काँग्रेस-एनसीपी सरकारच्या काळात झाली. काँग्रेसने काम सुरू केले, आणि भाजपाने फक्त फित कापली.” असे म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना हुसैन यांनी, “नवी मुंबई विमानतळाची जमीन अधिग्रहण प्रक्रिया काँग्रेस सरकारने पूर्ण केली होती. मुंबई मेट्रोचे उद्घाटन डॉ. मनमोहन सिंह आणि विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. पंतप्रधानांनी हे जाणूनही विसरण्याचे नाटक केले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांनी वास्तव सांगावे.” असे आवाहन पंतप्रधान मोदींना केले आहे.

त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा जरी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला असला, तरी त्यावरून सुरू झालेली राजकीय प्रत्युत्तरांची मालिका आता श्रेयवादाच्या लढाईत रुपांतरित झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानिमित्ताने नरेंद्र मोदींनी आगामी महानगरपालिकेचे बिगुल वाजवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे येत्या काळात ही श्रेयवादाची लढाई अधिक रंगणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडते? याबद्दल सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.