हजारो देशी-विदेशी पक्षी स्थायिक; जागतिक हवामान बदलाचा परिणाम?
उरणच्या खाडी किनाऱ्यावरील पाणजे,फुंडे तसेच दास्तान परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासूनच हवामानाच्या बदलामुळे हजारो मैलांचा प्रवास करीत येणाऱ्या देशी विदेशी पक्ष्यांचे उरण हे स्थान बनले आहे. या पक्ष्यांचा जून महिन्यात परतीचा प्रवास सुरू होतो. असे असले तरी पर्यावरणात जागतिक पातळीवर झालेल्या परिणामामुळे पक्षांनीही आता याच विभागात कायमचे वास्तव्य करण्यास सुरूवात केल्याने तेही आता स्थायिक होऊ लागले आहे; मात्र परिसरात सुरू असलेल्या खाडीतील मातीच्या भरावामुळे तसेच उद्योगानिर्मितीमुळे या पक्ष्यांची आश्रस्थाने असलेले पानथळे नष्ट होऊ लागले आहेत.या संदर्भात पक्षी मित्र संघटनांनी केंद्र सरकारकडे उरण मधील पानथळे संरक्षित करण्याचीही मागणी अनेकदा केली आहे.या संदर्भात वन विभाग अहवाल पाठविणार असल्याची माहीती वन विभागाने दिली.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता दुत असलेल्या पक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे बनले आहे. पृथ्वीवरील धोक्याचा पहिला संकेत पक्ष्यांमुळेच मिळतो.त्यामुळे दरवर्षी सैबेरीया,तजाकीस्तान मधून गुजरात मार्गे तसेच विविध जातीचे पक्षी दरवर्षी भारतात येतात. यापैकी अनेक देशी विदेशी जातींच्या पक्ष्यांचे उरण परिसरात वास्तव्य असते. या मध्ये पेन्टेड स्टा्र्क, इबीस, ईगट्र यांच्यासह लेसर व ग्रेटर जातीचे फ्लेमिंगो यांचाही समावेश आहे. उरणच्या खाडी किनाऱ्यावरील खारफुटीत पक्षांचे मुख्य खाद्य असलेले मासे,किडे,विविध जातीचे खेकडे यांचा मोठा साठा असल्याने मोठया संख्येने पक्षी येथे येतात. त्यामुळे या विविध जातींच्या पक्षांना न्याहाळणे,त्यांचा अभ्यास करण्याची संधी या परिसरात पूणे,मुंबई,नवी मुंबई ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ातील पक्षी मित्रांना मिळत आहे; मात्र या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावमुळे खाडीचा भाग कमी होऊ लागला आहे. त्याच प्रमाणे येथील पक्षांची खाद्य निर्माण करणारी खारफुटीही नष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पक्षांच्या खाद्याचे प्रमाण घटू लागले आहे.असे असले तरी दरवर्षीच्या पक्षांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पक्ष्यांना कायमस्वरूपी पानथळे संरक्षित करण्यासाठी वन विभागाला अहवाल पाठविणार असल्याची माहिती उरणचे वनसंरक्षक चंद्रकांत मराडे यांनी दिली आहे. तसेच शासनाकडून या परिसराची संरक्षित पानथळे म्हणून घोषणा वन मंत्रालयाकडून होऊ शकते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.