नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य शासनाने चौदा गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या शिष्टमंडळाने आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या भेटीदरम्यान नागरिकांनी नव्याने महानगरपालिकेत सामाविष्ट झालेल्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार मंदा म्हात्रे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पायाभूत सुविधा विकास, रस्ते व पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची गरज तसेच कर व प्रशासकीय सुविधांशी संबंधित विषयांचा समावेश होता.
आमदार म्हात्रे यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, राज्य शासनाचा हा निर्णय हा स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीचा सकारात्मक निकाल आहे. चौदा गावांचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांच्या वृद्धीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीनअसे आश्वासन दिले. चौदागाव सर्वपक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष सुखदेव पाटील, सचिव गुरुनाथ पाटील, खजिनदार चेतन पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, भरत भोईर, गणेश जेपाल आदी यावेळी उपस्थित होते.
वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणुका झाल्यानंतर ६ महिन्यानंतर १४ गावांना पुन्हा नवी मुंबईबाहेर काढणार असल्याचे सांगितले असल्याने या पार्श्वभूमीवर १४ गाव समितीने आमदार म्हात्रे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चेला सुरवात झाली आहे.