पनवेल : कळंबोली सर्कल येथील वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्ते आणि उड्डाणपुलांच्या विस्ताराचे जाळे विणले जात आहे. मात्र या उभारणीच्या कामामध्ये ६९२ वृक्ष अडथळा ठरत असल्याने महाराष्ट्र पायाभूत सुविधा राज्य विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) पनवेल महापालिकेकडे यातील ६९० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा आणि दोन वृक्षांची तोड करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने नागरिकांच्या हरकती यावर मागविल्या आहेत. पुढील सात दिवसांत या हरकती घेतल्यास महापालिका त्याची दखल घेणार असल्याचे पालिकेने आज प्रसिद्ध केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
कळंबोली सर्कलच्या विस्तारीकरणाच्या कामामध्ये ७ वर्षांपासून ते ६० वर्षे वयाचे वृक्ष बाधित होत आहेत. यामधील सर्वाधिक झाडे १० ते ३५ वर्षे वय असलेली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कल ते जेएनपीटी मार्गाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये रस्ते छान बांधले मात्र मार्गाशेजारी हिरवळ उभारण्याचा सल्ला राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पनवेल येथील भाषणात दिला होता. कळंबोली सर्कलच्या विस्ताराच्या कामासाठी ४८४ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या कामात सुरूवातीला १४०५ वृक्ष अडथळा ठरत होती. त्यापैकी ७१३ वृक्ष वाचविण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र पायाभूत सुविधा राज्य विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता दीपक हिंगे यांनी केला आहे. तसेच ६९२ वृक्षांपैकी ६९० वृक्षांचे पुनर्रोपणाला परवानगी मिळाल्यास या वृक्षांचे संवर्धनाची एका खासगी कंपनीला देण्यात येणार असल्याचे सुद्धा कार्यकारी अभियंता हिंगे म्हणाले.
या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मंजुरी देण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. ४८४ कोटी रुपयांचे कळंबोली सर्कल विस्ताराचे काम मेसर्स ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्या कुटुंबियांची आहे.
दरम्यान, पनवेल महापालिकेकडे या वृक्षांचे पुनर्रोपनाचा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ६९० झाडांची पाहणी केली. त्यानंतर संबंधित झाडांचे पुनर्रोपन करण्याच्या प्रस्तावाची नागरिकांच्या हरकतीसाठी नोटीस जाहीर करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी दिली.
पुनर्रोपण केली जाणारी झाडे
स्टीलयार्ड रोड (पुणे – जेएनपीटी मार्ग) – १८९
मॅक्डोनल्ड रोड – कळंबोली सर्कल – २००
शिळफाटा रोड – स्टीलयार्ड रोड – २७
जेएनपीटी रोड – एमजीएम रोड – २७४
वृक्षसंपदा
विलायती चिंच (५६), पिंपळ (७०), सुबाभूळ (२३), बदाम (७४), रेन ट्री (१५), उंबर (१२७), गुलमोहर (२९), नारळ (४०), जांभूळ (१४), आंबा (२२), निलगिरी (१०), शेवगा (७), चेरी (१२), अर्जुन, आसन, बकूळ, बेल, चाफा, फणस, रामफळ, सिताफळ, जंगली झाडे, पाम वृक्ष