नवी मुंबईतील विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आज याच मागणीसाठी नवी मुंबईतील सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भुमीपूत्र तसंच प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी सरकारला विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि बा पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरण वादावर दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटलांचं नाव देण्यासाठी आज आंदोलन करत सिडकोला घेराव घालण्यात आला. आंदोलन असल्याने सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. याशिवाय वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनांचे मार्गदेखील बदलण्यात आले होते. यावेळी नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं.

दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

दम्यान या संपूर्ण प्रकरणावर तसंच आंदोलनावर दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली. पुढे ते म्हणाले की, “हा वाद आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांच्या नावाला विरोध करणारे नेते कित्येक वर्षांपासून त्यांचं नाव द्यावं यासाठी आग्रही होते. त्यामुळे हा वाद राजकीय आहे”.

“आमच्या ‘दिबां’नी करुन त्याग, आम्हाला केलंय ‘अस्सल’ वाघ”

मनसे आमदार राजू पाटीलदेखील झाले होते सहभागी

मनसेचे आमदार राजू पाटीलदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. “ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असातना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो आहोत,” असं राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

दरम्यान राज ठाकरेंनी शिवरायांचं नाव असावं अशी भूमिका घेण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जर ते विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचं नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं”. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची आहे असंही त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद

या मोर्चात मोठा जनसमुदाय उतरणार असण्याची शक्यता असल्याने बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येत होता. तसंच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक वळविण्यात आली होती.