नवी मुंबई: नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल ३ कोटी ७७ लाख २८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नशा मुक्त नवी मुंबई हे उद्दिष्ट ठेवणे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शखाली पोलीस विभाग काम करत आहे. त्याच अनुशंघाने नशेचे पदार्थ पुरवठादार यांच्यावर विशेष लक्ष ठेवल्याने अनेक गुन्हेगारांना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. अशीच धडाकेबाज कारवाई नुकतीच करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील कामोठे येथे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आला असून मागणी प्रमाणे त्याचे वितरण केले जात आहे. अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले गेले. या माहितीच्या आधारे २१ जुलै रोजी कामोठे येथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी फरहान शेख रा. कांदिवली, मुंबई याच्याकडून २२.४० लाखांचा गुटखा व कंटेनर जप्त करण्यात आला.
पुढील तपासात हा गुटखा भिवंडी येथून आणल्याचे निष्पन्न झाले. फरहान शेख याला ताब्यात घेत अधिक चौकशी केले असता त्यानंतर येवई गावाजवळ एका ठिकाणी अजून साठा असल्याचे समोर आले. त्या ठिकाणीही तात्काळ छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी ४ कंटेनरमध्ये ३.५४ कोटींचा गुटखा साठा आढळून आला.
भिवंडी नजीक येवई गावात छापा टाकण्यात आल्यावर त्या ठिकाणी जितेंद्र मांगीलाल वासूनियरा आणि भूपेंद्रराजेंद्र सहारा तसेच भवर खेमराज सिहरा या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशीकेल्यावर अटक केली आहे.या प्रकरणी फरहान शेख सह जितेंद्र मांगीलाल वासूनियरा आणि भूपेंद्रराजेंद्र सहारा तसेच भवर खेमराज सिहरा यांना अटक करण्यात आली असून त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात ३ कोटी ७७ लाख २८ हजार रुपयांचा गुटखा आणि ५ कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली. ज्या राज्यात गुटख्याला बंदी नाही अशा ठिकाणाहून चोरी छुपे गुटखा राज्यात आणणे, त्याचा साठा करणे, मागणी प्रमाणे त्याचे वितरण करणे. हे सर्व करण्यासाठी मोठी साखळी आहे. सध्या तीन संशयितांना ताब्यात घेतले असले तरी यात अनेक संशयितांचा सहभाग असणार आहे. या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. असेही सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले.