नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून, वाहनचालकांमध्ये नियमांचे भान राहिलेले नाही. यातून एपीएमसी परिसराचा बकालपणा वाढला असून, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.मागील सात महिन्यांत वाहतुकीस अडथळा ठरतील अशा पार्किंग केलेल्या किंवा एकाच जागी थांबलेल्या वाहनांवर नियमबाह्य वर्तनाबद्दल विविध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक मार्गावर वाहन अडथळा ठरणे, विनापरवानगी उभे राहणे आणि संभाव्य धोका निर्माण करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

काही प्रकरणांमध्ये वाहने तात्पुरती जप्त करण्यात आली, तर काही गंभीर प्रकरणांत गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ही कारवाई पुरेशी ठरत नसल्याचे वास्तव आहे.मसाला मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी ट्रक आणि मालवाहतूक वाहनांची दुहेरी रांग लावून पार्किंग केल्यामुळे रस्ते अरुंद होत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच, १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक मागे घेताना एका रिक्षाला धडक बसल्याने चालक जखमी झाल्याची घटना ताजी आहे. ज्यात रिक्षाचेही नुकसान झाले आहे.रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची उपस्थिती अत्यल्प असल्याने ही बेशिस्त वाढली असून, बाजारात येणाऱ्या वाहनांचा ओघ लक्षात घेता रस्ते पूर्ण अडवले जात आहेत. विशेषतः वाशी सेक्टर १९ – सी येथे असलेल्या मसाला मार्केट परिसरात ही परिस्थिती अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे लहान वाहनांना वळण घेणे कठीण ठरत आहे.

स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही ट्रक पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, वाहतूक नियंत्रणासाठी गस्त वाढवणे, आणि प्रबोधन मोहीम या उपाययोजना कायमस्वरूपी राबवल्या जात नाहीत, अशी नाराजी व्यापारी आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची घटना घडल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला असून, रात्रीच्या गस्तीसाठी अतिरिक्त अंमलदार नेमण्यात आले आहेत. ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांचे प्रबोधन सुरू असून, दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.शिवाजी भांडवलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वाहतूक विभाग, एपीएमसी