नवी मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर वाशीच्या मुंबई एपीएमसी फळ बाजारात दाखल झालेल्या हापूस आंब्याला विक्रमी दर मिळाला आहे. देवगडवरून आलेल्या हापूस आंब्याच्या ६ डझनांच्या पेटीला तब्बल २५ हजार रुपयांचा भाव मिळाला असून, आजपर्यंत मिळालेल्या दरांपैकी हा दर सर्वाधिक मानला जात आहे.
वाशीतील मुंबई एपीएमसी फळ बाजारात यंदा देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची ६ डझनाची पेटी पाठवली होती. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोकणातील हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल होतो; मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यातच तेही दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई एपीएमसी फळ बाजारात कोकणातील ‘हापूस’ दाखल होणे ही एपीएमसीच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली.
यावेळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नानाभाऊ जेजूरकर अँड कंपनी या व्यापाऱ्यांकडे ही पेटी दाखल झाली होती. त्या दिवशी या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली आणि आंबे पूर्णपणे पिकल्यानंतर विक्रीसाठी ठेवण्यात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी बोली लावण्यात आली असता, या मुहूर्ताच्या आंब्याच्या पेटीला तब्बल २५ हजारांचा विक्रमी दर मिळाल्याचे व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी सांगितले. मुंबईतील एका ग्राहकाने ही पेटी खरेदी केली असून, त्याचे नाव व्यापाऱ्यांनी गोपनीय ठेवले आहे. आतापर्यंत हापूस आंब्याच्या पेटीला २० ते २२ हजारांपर्यंत विक्रमी दर मिळाला होता. परंतु, यंदा लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर आलेल्या हापूसच्या पेटीला २५ हजारांचा दर मिळाल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिर्सेकर यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्या कलमांवर त्यांनी विशेष प्लास्टिक आवरण व फवारणी करून फळधारणा टिकवली. त्यातून तयार झालेल्या आंब्यांपैकी पहिली पेटी दिवाळीपूर्वीच बाजारात पोहोचली. यंदा आंबा हंगामाला अद्याप सुरुवात झाली नसती तरी मुहूर्ताच्या हापूस पेटीला मिळालेल्या या विक्रमी दरामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, यंदा पावसाच्या परिणामामुळे हापूसचा हंगाम काहीसा उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या वर्षी हापूस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात दाखल होईल, असा अंदाज आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तरी कोकणातून इतक्या लवकर आंबा मुंबईत पोहोचणे ही एक वेगळीच घटना ठरली असून, आंब्याला विक्रमी दर मिळाल्याने बाजारात “हापूसची दिवाळी” अशीच चर्चा रंगू लागली आहे.
